बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) ४० दिग्गज नेत्यांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर अशा एकूण 40 नावांचा समावेश आहे.
बिहारच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ही यादी प्रसिद्ध झाली आहे.
फडणवीसांसारख्या अनुभवी नेत्याच्या सहभागाने पक्षाची रणनीती मजबूत होईल असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा समावेश आहे.
तसेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, हरियाणाचे मुख्यमंत्री नायक राम यांच्यासह भाजपचे इतर मुख्यमंत्री व वरिष्ठ नेतेही प्रचार सभांसाठी रवाना होणार आहेत. विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिहारच्या प्रचाराचा महत्त्वाचा भाग सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली असून, त्यांच्या सहभागामुळे मराठी-बिहारी मतदारांमध्ये पक्षाची पकड वाढेल, असा विश्वास पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला आहे.
बिहार निवडणूक दोन टप्प्यांत –
बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार असून, पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी ही यादी प्रभावी ठरेल, असे पक्षाचे प्रवक्ते म्हणाले. भाजप-जेडीयू आघाडीला बिहारमध्ये विजयी करण्यासाठी हे दिग्गज नेते प्रचारफेरी सुरू करणार आहेत. 243 सदस्य असलेल्या बिहार निवडणुकीसाठी 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान होणार असून 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

















