पालघर-योगेश चांदेकर
पालघरः विरोधक लाडकी बहीण योजना बंद पडणार असल्याचे कितीही घसा खरवडून सांगत असले, तरी अजित पवार जोपर्यंत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत, तोपर्यंत लाडकी बहीण योजाना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच पालघरचे संपर्कमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार आनंदभाई ठकूर यांनी पालघर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सांगितले.
डहाणू येथे दशश्री माळी हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना, उध्दवबाळासाहेब ठाकरे गट, आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवारगटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यात यतीन नम, प्रसाद पाटील, हेमंत धनमेहेर निनाद घरत आदींचा समावेश होता या वेळी राजाराम मुळीक,संतोष मराठे,करण ठाकूर, संदीप वैद्य, रोहिणी शेलार, जयेश शेलार, विपुल राऊत, स्वाती राऊत, शैलेश करमोडा, , जितेंद्र पटेल, हरेश मुकणे, पांडुरंग बेलकर, विलास सुमडा, रवींद्र संखे, सुजय वडे, अजित संखे, मंदार संखे, मुक्ताताई भोसले, भाऊ साबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्याला डहाणू, तलासरी, वाडा, पालघर, जव्हार मोखाडा आदी तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

आनंदभाईंच्या नेतृत्वाखाली पक्षाला बळकटी
या वेळी झिरवाळ म्हणाले, की पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार, खासदार तसेच लोकप्रतिनिधी नसताना या पक्षाला गळती लागायला हवी होती; परंतु तसे झाले नाही. जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर यांनी पक्ष टिकवून ठेवला. पक्ष वाढवला. त्याला कारण आपल्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हेच आहेत. ते वेळ पाळतात आणि दिलेला शब्दही पाळतात. पक्ष संघटना, कार्यकर्ते यापेक्षा राज्यातील जनतेचा विचार करून ते निर्णय घेत असतात. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत कार्य करणारा हा नेता असल्यामुळे आपल्या पक्षाला कुठलीच चिंता नाही.

ठेकदारांचे पैसे देणार
राज्याची आर्थिक स्थिती सर्वांना माहीत आहे, तरीही ठेकेदारांचे राहिलेले पैसे देण्याचा प्रयत्न होता; परंतु त्यात अतिवृष्टी झाली. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यासाठी ३१ हजार सहाशे कोटी रुपयांची तरतूद करावी लागली. त्यामुळे ठेकेदारांचे पैसे देण्यास थोडासा विलंब झाला असला, तरी आता केंद्र सरकार मदत देणार असल्याने काही फायली आता निकाली निघायला लागल्या आहेत. आदिवासी विभागाच्या अनेक फाईली मी स्वतः मंजूर करून घेतल्या आहेत, असा दावा त्यांनी केला.

संवेदनशील नेता
आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ करण्याची चर्चा जेव्हा सुरू झाली, तेव्हा अजितदादांनी सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात निर्णय घेतला. संवेदनशील दृष्टी असलेला हा नेता असल्यामुळे पक्ष राज्यस्तरावर वाढतो आहे. राज्यात अजितदादांनी कोणालाही संपर्क मंत्री केले नाही; परंतु मला पालघरचा संपर्क मंत्री केले यावरून अजित दादांचे पालघर वर विशेष प्रेम आहे हे सिद्ध होते, असे झिरवाळ म्हणाले. या वेळी त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा मित्रपक्षांच्या दिलेल्या इशाऱ्यावर भाष्य करणे टाळले.

कोमात गेलेलो नाही
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर म्हणाले, की डहाणू विक्रमगड आणि वाडा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत. पक्षाने शंकर नम, कृष्णा घोडा यांच्यासारखे नेतृत्व येथे दिले होते. त्यामुळे मित्रपक्ष आणि आम्हाला गृहीत धरू नये. जिल्ह्याला आमदार नाही म्हणून आम्ही काहीच करायचे असे होत नाही किंवा आम्ही कोमातही गेलेलो नाही. अजितदादांच्या नेतृत्वाखालील पक्ष असल्याने आम्ही जनतेची कामे मार्गी लावत असतो.
मित्रपक्षांची भाषा बदलली
वसई-विरारचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक म्हणाले, की सत्ता नसली, तरी आम्ही सत्तेचे भागीदार आहोत, हे मित्रपक्षांनी लक्षात घेतले पाहिजे. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही वाद आणि विवादामुळे पक्षाचे नुकसान झाले. मित्रपक्षाने आमचा वापर करून घेतला; मात्र आता जबाबदारी आल्याने त्यांची भाषा बदलली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
कोट
‘अजित पवार हे पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत सातत्याने काम करत असतात. जनतेचा विकास हा एकमेव ध्यास घेतलेला हा नेता सातत्याने कार्यमग्न असतो. त्यांच्याच इतके काम राज्यातला अन्य कुणीही नेता करीत नाही, हे आपल्या पक्षाचे भाग्य असून पक्ष नक्कीच फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल, याबाबत श्री शंका नाही.
आनंदभाई ठाकूर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, पालघर

















