महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आगामी शैक्षणिक वर्षात पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या तीन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) आता वर्षातून दोनदा होणार आहेत.
त्यानुसार पहिली ‘सीईटी’ परीक्षा एप्रिल-२०२६ मध्ये, तर दुसरी परीक्षा मे-२०२६ मध्ये घेण्यात येणार आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीईटी परीक्षेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यात पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, ‘सीईटी कक्षा’चे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ आदी उपस्थित होते.
देशपातळीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत ‘जेईई मेन’ ही परीक्षा दोन सत्रात घेण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देण्याच्या दोन संधी उपलब्ध होतात. त्याच धर्तीवर आता राज्यातही अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि व्यवस्थापन या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या सीईटी परीक्षा दोनदा घेण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनाही दोनदा प्रवेश परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असणार आहे. विद्यार्थ्यांनी दोन्ही प्रवेश परीक्षा दिल्यास, त्यांना दोन्हीपैकी ज्या परीक्षेत जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहीत धरले जाणार आहेत.
















