नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वांत मोठी व सुंदर इमारत बनली आहे. मंत्रालयाचा कारभार येथून चालविता येईल, इतक्या भव्य स्वरूपाच्या या इमारतीतून सर्वसामान्य व्यक्तींसाठी चांगला व गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन गुरुवारी (ता. १३) त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, क्रीडा व युवक कल्याणमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, खासदार डॉ. शोभा बच्छाव, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे, आमदार सुहास कांदे, मुफ्ती मोहम्मद इस्माईल, दिलीप बोरसे, डॉ. राहुल आहेर, दिलीप बनकर, राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, मंगेश चव्हाण, किशोर दराडे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार उपस्थित होते.
ओमकार पवार यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, कंत्राटदार अभिजित बनकर यांसह विभागप्रमुख उपस्थित होते.
माजी अध्यक्षांची उपस्थिती
उद्घाटनासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, विजयश्री चुंभळे, बाळासाहेब क्षीरसागर, मायावती पगारे, पंढरीनाथ थोरे, माजी सभापती मनीषा पवार, अलका जाधव, यतिंद्र पगार यांसह माजी सदस्या अमृता पवार, लता बच्छाव, नूतन आहेर, जे. डी. हिरे, यशवंत ढिकले, उदय जाधव, सुरेश कमानकर, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब माळी, अशोक टोंगारे, विनायक माळेकर, गोरख बोडके, विलास बच्छाव, उदय सांगळे आदी उपस्थित होते.
‘सीईओ’च मुख्य कारभारी
जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीची पाहणी करताना मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या दालनास भेट दिली. सीईओ पवार यांना खुर्चीत बसवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांनी त्यांच्या शेजारी उभे राहून छायाचित्र काढले. लोकशाहीत लोकप्रतिनिधी श्रेष्ठ ठरतात, तर प्रशासनात मुख्य कार्यकारी अधिकारी हे ‘मिनी मंत्रालया’चे प्रमुख असल्याने त्यांना खुर्चीत बसवून जणू प्रशासनच येथील मुख्य कारभारी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे व मंत्र्यांनी येथे दाखविले.
मंत्रालयाचा कारभार ‘मिनी मंत्रालया’तून
जिल्हा परिषदेला ‘मिनी मंत्रालय’ असेही म्हटले जाते. दोन्ही ठिकाणांचा कारभार एकसारखा असल्याने कामकाजाची पद्धत एकसमान असते. हा धागा पकडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणात जिल्हा परिषदेची इमारत इतकी भव्य आहे, की येथून मंत्रालयाचा कारभार चालविता येईल, असे सांगितले. पण, त्याची आवश्यकता भासणार नसल्याचे सांगत त्यांनी आधीच्या वाक्याला जोड दिल्याने कार्यक्रमस्थळी स्मितहास्याचे फवारे उडाले.
















