पालघर-योगेश चांदेकर
भाजपविरोधात महायुतीतील अन्य घटक पक्ष आणि महाविकास आघाडी एकत्र
पालघरः नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून आज अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी भारतीय जनता पक्षाने शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्षपदासाठी भरत राजपूत यांचा तर नगरसेवकपदासाठी अन्य २७ उमेदवारांचे अर्ज दाखल केले. भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून, भाजपत अन्य पक्षीय कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रवेशानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. स्वबळावर नगरपालिका जिंकण्याचा विश्वास राजपूत आणि खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी व्यक्त केला.
दरम्यान, डहाणू नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आता वेगवेगळी राजकीय समीकरणे आकाराला येत आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने आपले बळ वाढल्याचे दाखवून दिले. त्यानंतर गेल्या काही दिवसांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अन्य पक्षातील नेत्यांचा भाजप प्रवेश होत असून भारतीय जनता पक्षाला पालघर जिल्हा परिषदेसह पालघर जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपरीषद निवडणुकांत स्वबळावर यश मिळेल, असा विश्वास वाटत आहे.
भाजपच्या स्वबळाच्या घोषणेनंतर विरोधकही एकवटले
आज डहाणू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी तसेच नगरसेवकांच्या २७ जागांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन केले. शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केले. भारतीय जनता पक्ष आपल्याला बरोबर घेणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि शरद पवार यांचे गट एकत्र आले आहेत. त्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. मात्र नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाचे उमेदवार अद्यापही जाहीर झालेले नाहीत.
वेगळी मोट
विरोधकांनी आता वेगळी मोट बांधायला सुरुवात केली आहे. डहाणू नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे यांची शिवसेना एकत्र आले आहेत. अद्याप उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यांच्याबरोबर आली नसली, तरी या तीन पक्षांनी माकपसह शिवसेनेच्या ठाकरे गटाला आणि काँग्रेसलाही बरोबर घेण्याची तयारी दाखवली आहे. आनंदभाई ठाकूर, कुंदन संखे, मिहीर शहा यांनी एकाधिकारशाहीविरोधात आम्ही एकत्र आल्याचे सांगत स्थानिक प्रश्नांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले.
कोट
‘भाजप कोणाशीही युती न करता स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर आणि विकासकामांवर जनतेचा ठाम विश्वास आहे. खा. डॉ. हेमंत सवरा यांनी दीड वर्षात तर आम्ही गेल्या आठ वर्षात नगरपालिकेत केलेल्या कामामुळे जनता आमच्या सोबत आहे. बिहारच्या निकालाने भाजपला जनसमर्थन आहे हे सिद्ध झाले आहे. डहाणू, जव्हार, मोखाडा, वाडा तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही भाजपचे वर्चस्व राहील. २६२ पैकी दीडशेहून अधिक जागा आम्ही जिंकू.
भरत राजपूत, जिल्हाध्यक्ष आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार, भाजप
कोट
पालघर व डहाणू नगरपालिकेत भाजपसाठी अतिशय अनुकूल वातावरणातून आहे. आमचे अध्यक्ष भरत राजपूत नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत. त्यांच्या सह २७ इच्छुक नगरसेवकांचे अर्ज दाखल झाले असून डहाणूत पक्षाची सत्ता निश्चित आहे. वरिष्ठांचे आदेश मिळाल्यास महायुतीसाठी प्रयत्न करू; परंतु बिहारच्या निकालावरून या ठिकाणी भाजपच विजयी होईल, याची आम्हाला खात्री आहे.
डॉ. हेमंत सवरा, खासदार, पालघर

















