पालघर-योगेश चांदेकर
स्थानिक आणि प्रदेश भाजपात विसंवाद
पालघरः भारतीय जनता पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डहाणू तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काशिनाथ चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवेश केला. हजारो कार्यकर्त्यांच्या या प्रवेशानंतर डहाणू तालुक्यात भाजपचे बळ वाढणार असून डहाणू नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता असताना आता राजपूत यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी कुरघोडी करून चौधरी यांचा साधू हत्याकांडाची संबंध जोडला असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीपासून राजपूत यांनी भारतीय जनता पक्षाला पालघर जिल्ह्यात यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. शिवसेनेच्या ताब्यात लोकसभा मतदारसंघ असताना तो भाजपकडे खेचून घेऊन तिथे डॉ. हेमंत सवरा यांची उमेदवारी प्रतिष्ठेची करून त्यांना निवडून आणण्यातही राजपूत यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपला यश मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अन्य जिल्ह्यात भाजपने जिल्हाध्यक्ष बदललेले असताना राजपूत यांना मात्र पुन्हा संधी देऊन भाजपने त्यांच्यावर विश्वास टाकला.
‘स्थानिक’ संस्थांच्या निवडणुकीतील यशासाठी पक्षप्रवेश
पालघर जिल्ह्यात पालघर जिल्हा परिषद तसेच महापालिका आणि नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्यासाठी राजपूत यांनी व्यूहरचना आखली आहे. त्यासाठी शिवसेनेचा शिंदे गट, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा गट तसेच माकप व अन्य पक्षातून भारतीय जनता पक्षात हजारो कार्यकर्त्यांना दाखल करून घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्याची तयारी त्यांनी चालवली आहे. खा. डॉ. सवरा आणि भाजपच्या पालघर जिल्ह्यातील आमदारांना तसेच ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन ते रणनीती आखत आहेत आणि पक्षप्रवेश घडवून आणत आहेत.

राजपूत यांना शह देण्यासाठी कुरघोडी
या पार्श्वभूमीवर भाजपच्या पक्षांतर्गत गटबाजीतून चौधरी यांच्या विषयी पक्षाकडे चुकीची माहिती दिली गेल्याचा संदेश पालघर जिल्ह्यात पसरला आहे. चौधरी हे ग्रामीण चेहरा असून त्यांचे डहाणू तालुक्यात वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ते नेते होते, तरीही त्यांचे पक्षातीत अनेकांशी चांगले संबंध होते. डहाणू नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळवायचे असल्यामुळे तसेच जिल्हा परिषदेतही चांगल्या जागा मिळवायच्या असल्याने बेरजेचे राजकारण करण्याचे राजपूत यांनी ठरवले आहे. त्यामुळे अन्य पक्षीय नेते व कार्यकर्त्यांना भाजपत आणले जात आहे.
२४ तासांत स्थगितीची नामुष्की
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासह अनेक कार्यकर्ते आतापर्यंत भाजपत दाखल झाले आहेत. रविवारी चौधरी यांचा व त्यांच्या समर्थकांचा भाजप प्रवेश होत असताना डॉ. सवरा यांनी भाजपचे पुस्तक जेव्हा लिहिले जाईल, तेव्हा त्यात पालघरच्या चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाची इतिहासात आवर्जून नोंद घ्यावी लागेल, असे कौतुकोद्गार काढले होते. या पार्श्वभूमीवर अवघ्या २४ तासांच्या आत प्रदेश भाजपला माहिती देण्यात आली. ही माहिती पक्षाकडे पूर्वीच असताना प्रवेशाअगोदर मात्र त्याबाबत कुणीच काही बोलले नाही. भाजपचे केंद्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी पूर्वी चौधरी यांचा पालघरच्या साधू हत्याकांडात सहभाग असल्याचा आरोप केला होता. आता याच मुद्द्यावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि पालघरचे पूर्वीचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाला स्थगिती दिली आहे; परंतु राजपूत यांचे पक्षात वाढत असलेले महत्त्व पाहून कोणीतरी पक्षांतर्गत विरोधकानेच हे घडवण्यामध्ये मोठा सहभाग घेतला असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्र्यांकडून समर्थन, प्रदेशाध्यक्षांची स्थगिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाचे समर्थन केले असताना चव्हाण यांनी स्थगिती दिल्याने पक्ष आणि सरकारचे प्रमुख यांच्यातही विसंवाद असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान माजी आमदार सुनील भुसारा यांनी चौधरी यांचा पालघर साधू हत्याकांडाशी दुरान्वयानेही संबंध नव्हता, हे स्पष्ट केले. साधू हत्याकांड हे चौधरी यांच्या जिल्हा परिषद गटात झाल्यामुळे पोलिसांनी त्यांना बोलावून घेतले. वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिसांच्या समवेत चौधरी तेथे गेले. त्यांच्यावर आत्तापर्यंत कोणतीही फिर्याद दाखल झालेली नाही असे मत भुसारा यांनी व्यक्ती केले
चौधरी यांचा भाष्य करण्यास नकार
प्रकाश गाडे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणात साधू हत्याकांड कोणी घडवले, त्यात कोण दोष आहे हे प्रकरण अजून न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयात गुन्हा सिद्ध होईलच; परंतु चौधरी यांचे आरोपपत्रात नाव नसतानाही आता त्यांचा संबंध जोडून त्यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती देणे चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. एकंदरीत चौधरी यांचा भाजप प्रवेश प्रवेशाच्या बातमीपेक्षा स्थगितीच्या बातमीने अधिक गाजला असे म्हणावे लागेल. दरम्यान, चौधरी यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला. राजपूत यांच्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
कोट
‘उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने चौधरी यांना ‘क्लीन चिट’ दिलेली आहे. उलट उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात आले आहे, अशा परिस्थितीत चौधरी यांच्या बाबत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षात असताना आमची जी भूमिका होती, तीच आताही भूमिका आहे. या निमित्ताने भाजपची मात्र दुट्टपी भूमिका समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना चौधरी यांच्यावर आरोप करायचे आणि आता भाजप केल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या भूमिका घ्यायच्या. यामुळे खरे तर भाजपचेच पितळ उघडे पडले आहे.
सुनील भुसारा, माजी आमदार

















