महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या उपनगरी रेल्वे व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरणाची घोषणा केली आहे. लवकरच लोकल ट्रेनमध्ये पूर्णत: वातानुकूलित (AC) डबे आणि स्वयंचलित दरवाज्यांची सुविधा उपलब्ध होणार असून, विशेष म्हणजे सेकंड क्लासच्या भाड्यात कोणताही वाढ केली जाणार नाही.
IIMUN यूथ कनेक्ट कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुंबई लोकलच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. फडणवीस म्हणाले की, शहराची लाईफलाईन मानली जाणारी ही व्यवस्था दररोज जवळपास 90 लाख प्रवाशांना वाहतूक सेवा पुरवते. वाढती गर्दी, अपुरी सुरक्षा आणि जुनाट पायाभूत सुविधा यामुळे प्रवाशांना होणाऱ्या अडचणींचा त्यांनी उल्लेख करत, या सुधारणांमुळे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि तंत्रज्ञानाधारित होणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की या योजनेअंतर्गत 268 नवीन AC लोकल ट्रेन आणण्याची योजना आहे. या नवनवीन गाड्या आधुनिक मेट्रोप्रमाणे असतील, ज्यामध्ये स्वयंचलित दरवाजे, उत्तम वायुवीजन, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुधारित सुविधांचा समावेश असेल. या गाड्या हळूहळू जुन्या आणि दरवाजेविरहित लोकल डब्यांची जागा घेतील. उल्लेखनीय म्हणजे इतक्या प्रचंड गुंतवणुकीनंतरही सेकंड क्लासचा प्रवास परवडणारा राहावा यासाठी भाडेवाढ न करण्याचा निर्णय सरकारने कायम ठेवला आहे.
मुंब्रा येथे नुकत्याच झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर ही घोषणा अधिक महत्त्वाची ठरते. नॉन-AC आणि दरवाजेविरहित डब्यातील गर्दीमुळे काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याने सुरक्षा व्यवस्था सुधारण्याची तातडीची गरज अधोरेखित झाली होती. त्यामुळे नव्या AC ट्रेनबरोबरच नॉन-AC लोकलमध्येही स्वयंचलित सेल्फ-क्लोजिंग दरवाज्यांची अंमलबजावणी केली जात आहे, ज्यामुळे गाड्यांतून पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
याशिवाय फडणवीसांनी ‘मुंबई वन’ अॅपचेही कौतुक केले. हे अॅप लोकल, मेट्रो आणि बस तिकीट एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत असल्याने प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो आणि प्रवास अधिक सुलभ होतो. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा उंचावण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
या सर्व सुधारणा योजनांमुळे मुंबईच्या उपनगरी रेल्वे नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण होऊन प्रवाशांना सुरक्षित, सुकर आणि परवडणारा प्रवास अनुभवायला मिळणार आहे. सरकारचे हे पाऊल लोकल प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारे ठरणार असून मुंबईच्या वाहतुकीच्या भविष्यासाठीही एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
















