मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबईची हवा विषारी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लोकांना सर्दी, खोकला, घसादुखीचा त्रास होत आहे. श्वास घेण्यास त्रास होतो. गुदमरल्यासारखं वाटतं. सलग सहाव्या दिवशी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक दिल्लीपेक्षा खराब नोंदवला गेला आहे. मुंबईचा हा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) तीनशेच्या पुढे गेला आहे. मुंबईच्या AQI 319 ची नोंदणी झाली आहे.
हवेची गुणवत्ता खराब असल्याने वाऱ्यांचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे दक्षिण आणि मध्य भागातील हवाही खराब पातळीवर नोंदवण्यात आली आहे. मुंबईची घसरलेली हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्य सरकार किंवा महापालिका प्रशासनाकडून आतापर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र पटेल आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक
आज (शुक्रवार, 20 जानेवारी) केंद्रीय मंत्री भूपेंद्र पटेल यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय बंगल्यावर पोहोचले. AQI पातळी 319 वर पोहोचली म्हणजे हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. त्या तुलनेत दिल्लीची हवेची गुणवत्ता मुंबईच्या तुलनेत चांगली आहे. दिल्लीचा AQI सध्या 308 च्या पातळीवर आहे.
चेंबूर आणि नवी मुंबईचा सर्वात खराब AQI
मुंबई आणि आजूबाजूची सर्वात वाईट स्थिती चेंबूर आणि नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता आहे. AQI ने नवी मुंबईत 362, अंधेरीमध्ये 327, चेंबूरमध्ये 352, BKC मध्ये 325, बोरिवलीमध्ये 215, वरळीमध्ये 200, माझगावमध्ये 331, मालाडमध्ये 319, कुलाबामध्ये 323 आणि भांडुपमध्ये 283 पार केले आहेत. चेंबूर आणि नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक पातळीवर आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारचा घेतला समाचार
अशा परिस्थितीत जनतेला मास्कचा वापर सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारचा समाचार घेतला आहे. मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅनबाबत सरकार गंभीर नसल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. यासंदर्भात शासनानेही काम बंद केले आहे. यावरून टीकेची झोड उठली आहे. प्रत्यक्षात मेट्रोचे काम, वाहनांची वाढती संख्या, रस्त्यांची दुरूस्ती, बांधकामे, धुळीचे लोट यामुळे शहरात वायू प्रदूषण झपाट्याने वाढले आहे.