पालघर – योगेश चांदेकर
पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांकडून अवैध मद्यविक्रीबाबत सुरू असलेल्या भोंगळ कारभाराला लगाम लावण्यासाठी अधीक्षकांनी कठोर भूमिका घेतली आहे. मात्र, जिल्ह्यातील परिस्थिती ‘जैसे थे’च असून, अधिकाऱ्यांनीअधीक्षकांच्या आदेशाला फारशी दाद दिली नसल्याचे दिसून येत आहे. बहुतांश अधिकाऱ्यांनी अवैध मद्यविक्रीवर प्रतिबंध घालण्याची, अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी पूर्णपणे झटकून स्वहित साधण्याचाच विडा उचलल्याचे मागील काही काळापासून दिसून येत आहेत. या कामात त्यांना झिरो नंबरचे मोठे ‘सहकार्य’ मिळत आहे. विशेष म्हणजे हे झिरो नंबरच त्यांच्यासाठी तारणहार ठरत असल्याची स्थिती आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात 20 ते 25 वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या झिरो नंबरना कार्यालयाबाहेर काढण्याचे आदेश अधीक्षकांनी काही दिवसांपूर्वी बजावले होते. मात्र, त्यांनी कार्यालयांमध्ये पुन्हा आपले बस्तान बसवले आहे. त्यामुळे ते एकप्रकारे हिरोच ठरले असून, या माध्यमातून अधीक्षकांच्या आदेशाला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचेच दिसून येत आहे. या झिरो नंबरकडे हप्तेखोर अधिकाऱ्यांची ‘कुंडली’ असल्यानेच ते घाबरत असल्याची चर्चा आहे.
यासोबतच काही झिरो नंबर कार्यालयातून ‘ऑफलाईन’ झाले असले तरी अधिकाऱ्यांसाठी अजूनही त्यांची ‘ऑनलाईन’ म्हणजेच मद्यविक्रेत्यांकडून हप्तेवसुलीची मोहीम सुरूच आहे. या हप्तेखोरीमुळे अधिकाऱ्यांची तुंबडी भरली जात असतानाच झिरो नंबरचीही वरकमाई जोमात सुरू आहे. या प्रकारामुळे मद्यविक्रेते मात्र त्रस्त झाले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी या प्रकारांची गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील गैरकारभाराची झाडाझडती घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

उघडपणे मद्यविक्री, तरीही ‘ऑल ईज वेल’
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात बिअर शॉप, बिअर बार, ढाबे, हॉटेल, पानटपऱ्या, किराणा दुकान, चायनीज कॉर्नरसह घरांमधूनही उघडपणे अनधिकृतरित्या मद्यविक्री केली जात आहे. एवढेच नव्हे तर राज्यात बंदी असलेली दमण बनावटीच्या दारूचीही विक्री सर्रास सुरू आहे. गावठी दारूचे धंदेही जोमात असून, दारूसाठी लागणारा नवसागरही मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. या अधिकाऱ्यांच्या ‘आशीर्वादा’ने जिल्ह्यात दारूचा महापूर वाहत आहे. असे असतानाही स्थिती ‘ऑल ईज वेल’ असल्याचे भासविले जात आहे.
मद्यविक्रीच्या स्पर्धेत झिरो नंबर सुसाट!
जिल्ह्यात झिरो नंबर म्हणून काम करणाऱ्यांपैकी अनेकांनी बिअर बार, बिअर शॉप, देशी बार थाटले आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध मद्यविक्रीही सुरू आहे. मात्र, अधिकाऱ्यांचे त्यांना पूर्णपणे अभय आहे. अधिकारी अवैध मद्यविक्रेत्यांकडून हप्तेवसुली करत असतानाच वेळप्रसंगी त्यांच्यावरच छापेमारी करून वेठीस धरत आहेत. मात्र, त्यांचे हस्तक असलेल्या झिरो नंबरवर कधीही कारवाई होत नसल्याने या प्रकाराला आळा घालणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अवैध मद्यविक्रीच्या व्यवसायात झिरो नंबरमध्ये एकप्रकारे स्पर्धाच सुरू असल्याचे दिसून येत आहे. यापैकी एका झिरो नंबरने तर उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांपेक्षा आपले शिक्षण जास्त असल्याचे सांगत त्यांनाच इशाऱ्यावर नाचविण्याचा प्रकार चालवला आहे. मात्र, त्याच्या बारची झडती घेण्याचे धाडस दाखवले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मद्यविक्रीचा ‘खेळ’ उठणार अनेकांच्या जीवावर
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे अनेक ठिकाणी गावठी दारूची निर्मिती व विक्री सुरू आहे. अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई न करता ‘अर्थपूण’ संबंधातून त्यांना अभय देण्याचा प्रकार अनेक अधिकाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे एखाद्या वेळी अशा दारूने बळी जाण्याचीही भीती व्यक्त होत आहे.