मुंबई: लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागण्यांसाठी आज सकल हिंदू समाजाकडून मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या भव्य मोर्चात भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्यासोबत आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, ॲड. अखिलेश चौबे आदी हिंदू पुरुष आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या मोर्चात बोलताना आ. प्रविण दरेकर म्हणाले की ज्या पद्धतीने हिंदू समाजातील मुलींना प्रलोभन देऊन, फूस लावून किंवा अत्याचार करून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. त्याचबरोबर लँड माफिया जागा हडप करत आहेत. तेथे वेगवेगळ्या प्रकारची धार्मिक स्थळे उभी करत आहेत. अशा वेळेला त्या ठिकाणी धर्मांतर विरोधी कायद्याची आवश्यकता आहे, अशी स्थिती आज निर्माण झालेली आहे. म्हणून केवळ भाजपा नाही तर सकल हिंदू समाज हा पक्षापलीकडे जाऊन, जाती धर्मापलीकडे जाऊन एकवटलेला आहे. त्याचे प्रत्युत्तर आज विराट मोर्चाच्या माध्यमातून दिसून येत आहे, असे दरेकर म्हणाले.

तर आ. नितेश राणे म्हणाले की, आमच्या विरोधात येणाऱ्यांविरोधात आम्ही लढू शकतो हे सांगण्याची गरज आहे. त्यासाठी हा मोर्चा निघणं हा ऐतिहासिक क्षण आहे. आमच्या माता भगिनींचं लव्ह जिहादमधून आयुष्य खराब करण्यात आलं. लँड जिहादद्वारे वर्चस्व निर्माण केलं तर आम्ही खपवून घेणार नाही. हे सांगणं गरजेचं होतं. महाविकास आघाडीनेही त्यांच्या काळात हिंदूंच्या सणासुदींवरही टाच आणली होती. या सर्व गोष्टींना या मोर्च्यातून उत्तर मिळेल. हिंदूंच्या आडवे कोणी येणार नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मुंबईतील हिंदू बांधवांची ताकद एकत्र रस्त्यावर उतारावी. तसेच, हिंदू म्हणून एकत्र येत मोर्चातून समाजाल महत्वाचा संदेश द्यावा, या उद्देशाने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले होते. या मोर्चात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतून विविध संप्रदायाचे प्रमुख, हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. मोर्च्याच्या प्रत्येक चौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मुंबई पोलिसांकडून सर्व खबरदारी घेण्यात आली.