banner 728x90

पालघर जिल्हा परिषदेकडून मृत शिक्षकाचीही बदली, शिक्षण विभागाच्या ऑनलाईन प्रक्रियेत सावळा गोंधळ

banner 468x60

Share This:

पालघर – योगेश चांदेकर

पालघर: सुस्त आणि निद्रिस्त प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची उदाहरणे पालघर जिल्ह्यात अनेकदा समोर आली आहेत. याच मालिकेत आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागानेही ऑनलाईन बदली प्रक्रियेतील यादीत सावळा गोंधळ केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोन महिन्यांपूर्वी मृत्यू पावलेल्या शिक्षकाची बदली करून यंत्रणेने दुर्लक्षितपणाचा कळसच केला आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या ‘तत्पर’ कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. सद्यःस्थितीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. ही बदली प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाकडून संबंधित शिक्षकांची माहिती योग्यप्रकारे दिली जाणे आवश्‍यक आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून या प्रक्रियेत चांगलाच गोंधळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

banner 325x300

जिल्हांतर्गत करण्यात येत असलेल्या या बदल्यांमध्ये हिंदी आणि गुजराती माध्यमाच्या शिक्षकांना पसंती क्रम भरण्याची मुभा मिळालीच नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यात या माध्यमाच्या 30 शाळाच नसल्याने संबंधित बदलीपात्र शिक्षकांना अर्ज भरता आला नाही, त्यामुळे त्यांच्यावर एकप्रकारे अन्यायच झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय काही शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज दाखल केले नसतानाही त्यांची नावे ऑनलाईन यादीत आली आहेत. अशाप्रकारे बदली प्रक्रियेत प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे ही बदली प्रक्रिया वादग्रस्त ठरली आहे.

शिक्षण विभागाचा गोंधळ केवळ एवढ्यापुरताच मर्यादीत राहिला नसून, बदली प्रक्रियेेच्या यादीत दोन महिन्यांपूर्वी मृत्यू पावलेल्या शिक्षकाचीही बदली करण्याचा प्रताप ‘कर्तव्यदक्ष’ यंत्रणेने केला आहे. बदली करण्यात आलेल्या मृत शिक्षकाचे नाव बाबू दिघा आहे. दि. 13 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यापूर्वी जोपर्यंत ते कर्तव्यावर हजर होते, त्या कालावधीपर्यंतचे त्यांचे वेतन शिक्षण विभागाद्वारे अदा करण्यात आले होते. या संदर्भात प्रशासनाला माहिती आहे. मात्र, आता बदलीच्या यादीत त्यांचे नाव आल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षक बाबू दिघा यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जव्हारचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पाठवणे आवश्‍यक होते. मात्र, त्यांनी ती का पाठवली नाही, तसेच त्यांनी ही माहिती पाठवली असेल तर शिक्षण विभागाकडून याकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

शिक्षक बाबू दिघा यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडे असती तर त्यानुसार ऑनलाईन बदली प्रक्रियेतून त्यांचे नाव वगळता आले असते. मात्र, आता ज्या शाळेवर बाबू दिघा यांची बदली करण्यात आल्याचे नमूद आहे, त्या शाळेत ऐनवेळी दुसऱ्या कोणत्या शिक्षकाची नियुक्ती केली जाणार किंवा प्रशासन अशावेळी काय भूमिका घेणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. शिक्षण विभागाच्या या दुर्लक्षित कारभारामुळे संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

गटशिक्षणाधिकाऱ्यांनी झटकले हात

जव्हारचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांच्याशी ‘लक्षवेधी’ने या संदर्भात संपर्क केला असता, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या प्रकरणात त्यांची भूमिका नेमकी काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पारदर्शकता, सुसूत्रतेला यंत्रणेकडून तिलांजली

शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता असणे आवश्‍यक आहे. मात्र, बेजबाबदार यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे या बाबींना तिलांजली देण्याचाच प्रकारच घडल्याचे दिसून आले आहे. गटशिक्षण अधिकारी जंगले यांनी प्रशासनाला माहिती पाठविली नसल्यास त्यांच्यावर कारवाई व्हावी किंवा त्यांनी माहिती पाठविली असल्यास संबंधितांवर कारवाई व्हावी. तसेच संपूर्ण बदली प्रक्रियेतील गोंधळाचीही वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!