पालघर-योगेश चांदेकर
सरपंच व संबंधितांची सहा तारखेला बैठक
आढाव्यानंतर प्रत्यक्ष पाहणी
पालघरः पालघर विधानसभा मतदारसंघातील डहाणू व पालघर तालुक्यात येणाऱ्या विविध प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांबाबत अनेक तक्रारी असून त्याचा आढावा आ. राजेंद्र गावित हे घेणार आहेत. आढावा बैठकीनंतर संबंधित गावांची ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाध्ये यांच्याशी या पाणी योजनांबाबत आ. गावित यांनी चर्चा केली आहे. पाणी योजनांना वारंवार मुदत वाढवून देऊनही अद्यापही काही कामे अपूर्ण आहेत. पाणी योजनांच्या वाहिन्या वारंवार फुटत असल्याच्या तसेच पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आ. गावित यांच्याकडे आल्या आहेत.
ग्रामसेवक, सरपंच, अधिकाऱ्यांची बैठक
आता आ. गावित यांनी याबाबत संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच तसेच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या योजनांच्या नेमक्या अडचणी काय आहेत, त्या कशा दूर करता येतील, पाणीपुरवठा कसा सुरळीत करता येईल याबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे.
१३ गावांचा आढावा
आ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या बाडापोखरण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या तारापूर, चिंचणी, धाकटी डहाणू, मोडगाव, वाणगाव, बाडापोखरण, आसनगाव, चंढीगाव, वरोर, वाढवण, गुंगवाडा तडीयाळे आदी गावाच्या सरपंच, ग्रामसेवकांना सहा जानेवारीला दुपारी दोन वाजता पालघर येथील शासकीय विश्रामगृहावर होणाऱ्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांची झाडाझ़डती
या पाणी योजनांचा आढावा घेण्यात आल्यानंतर आ. गावित १३ गावांच्या पाणी योजनांची प्रत्यक्ष पाहणी करून पाणीपुरवठा योजनेत काय काय अडचणी आहेत, त्यावर काय उपाययोजना करता येतील, निधीची पुरेशी तरतूद आहे का, निधी उपलब्ध झाल्यानंतर तो का खर्च केला नाही आदी प्रश्नांवर विचारविनिमय करून अधिकाऱ्यांची आ. गावित झाडाझ़़डती घेणार आहेत.