पालघर-योगेश चांदेकर
‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमातून आमदार गावित यांनी सोडवले विविध प्रश्न
पालघर जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील जनतेच्या ऐकल्या तक्रारी
जागेवरच निर्णय घेऊन तक्रार निवारण
पालघरः पालघर जिल्ह्यातील विविध प्रश्न सरकार दरबारी तसेच वेगवेगळ्या यंत्रणांकडे प्रलंबित असून त्याबाबत नागरिकांना वेळोवेळी पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. या पार्श्वभूमीवर आता आमदार राजेंद्र गावित यांनी ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला असून, या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या तक्रारी ऐकून त्याबाबत जागेवरच निर्णय घेण्यात येत असल्याने जनतेत समाधान आहे.
आ. गावित यांनी विधानसभेवर निवडून आल्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही अधिवेशनात पालघर जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडले. त्याचबरोबर ‘जलजीवन मिशन योजने’तील गैरप्रकार तसेच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार विधानसभेच्या सभागृहात चव्हाट्यावर आणला. अधिकारी, पदाधिकाऱ्यांमध्ये गैरव्यवहाराबाबत कसे साटेलोटे आहे, हेही त्यांनी मांडले. आ. गावित वेगवेगळ्या व्यासपीठावरून जनतेच्या वेगवेगळ्या प्रश्नांचा निपटारा करतात, अनेकदा ते स्वतः समस्येच्या ठिकाणी जाऊन ती समजावून घेतात. अधिकाऱ्यांसोबत दौरा करतात आणि जागेवरच अधिकाऱ्यांना निर्देशही करतात.
पाणी योजनांना भेटी
पालघर तालुक्यातील विविध प्रादेशिक योजनांबाबत त्यांनी अशाच प्रकारे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन स्थानिक जनतेसोबत पाणी योजनांना भेटी दिल्या आणि तिथे प्रश्न, समस्या जागच्या जागीच सोडवल्या. त्यामुळे आ. गावित यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. पालघर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता आणि सरकारी कर्मचारी अनेकदा भेटत नसल्याने त्यांची कामे वेळेवर होत नाहीत. स्थानिक आमदार, खासदारांकडे जनता आपली कामे घेऊन जाते; परंतु तेथेही न्याय मिळत नाही, असा पूर्वीचा अनुभव होता; परंतु आ. गावित यांनी मात्र आता आमदार विलास तरे यांना सोबत घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच सर्व सरकारी कार्यालय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे.
काही तक्रारींचा जागीच निपटारा, काही संबंधित विभागांकडे
या बैठकात नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यावर समाधानकारक उत्तरे देण्यात येतात. पालघर येथे तहसील कार्यालयाच्या सभागृहात अशा स्वरूपाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नागरिकांनी 222 तक्रारी केल्या. दोन्ही आमदारांनी या तक्रारी ऐकून घेऊन जनतेच्या प्रश्नांना उत्तर दिले. काही तक्रारींचे जागीच निवारण केले. काही तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवण्यात आल्या.
वनविभागाने जप्त केलेली गाडी ग्रामपंचायतीला
आ. गावित यांनी काही प्रश्नावर जागीच आदेश दिले. तारापूर ग्रामपंचायतीची कचरा व्यवस्थापन गाडी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अखत्यारित जमा करून घेतली. त्याबाबत सरपंच आणि ग्रामसेवकांनी तक्रार केली असता आ. गावित यांनी कचरा टाकण्यासाठी असलेली गाडी मँग्रोव्ह वनविभागाची नसून, सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याने ती तात्काळ ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. त्यांनी ग्रामपंचायतीला न्याय मिळवून दिला, तर कांद्रेभुरे ग्रामपंचायतीचे सरपंच जगदीश पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून बांधकाम विभागाचे अधिकारी त्यांना माहिती देत नसल्याचे स्पष्ट झाले. या तक्रारीचे निवारण आ. तरे यांनी जागीच करून माहिती देण्याचे आदेश दिले.
हे होते उपस्थित
या वेळी पालघरचे तहसीलदार रमेश शेंडगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, वसंत चव्हाण, महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती मेहेर, शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळे, उपजिल्हाप्रमुख नीलम संखे, बोईसर शहर प्रमुख अतुल देसाई, जयंत गुरोडा, किरण पाटील आदी उपस्थित होते.
कोट
‘ प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. जनतेची बांधिलकी म्हणून, आम्ही ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या तक्रारींचे जागीच निवारण व्हावे, हा उद्देश आहे. पालघर तालुक्याबरोबरच डहाणू तालुक्यातही हा कार्यक्रम घेण्यात येईल.
राजेंद्र गावित, आमदार, पालघर विधानसभा मतदारसंघ