पालघर-योगेश चांदेकर
लाघवी स्वभाव आणि कष्टाच्या जोरावर कमी वयात उभारला व्यवसाय
अल्पशिक्षित तरुणाचे इन्स्टाग्रामवर हजारो चहाप्रेमी
पालघरः आयुष्य हे खवळलेल्या समुद्रासारखा असतं. वरवर ते शांत दिसत असलं, तरी आत अगणित गुपित, गूढपणा व अस्थिरतेनं ते भरलेलं असतं. एका मागून एक नवनव्या लाटा निर्माण होत असतात. कधी त्या छोट्या, तर कधी मोठ्या असतात. कधी कधी अगदी पहाडासारखी त्सुनामी बनून लाट येत असते. अशा लाटांचा कणखरपणे सामना करून आयुष्य घडवायचं असतं. या लाटांच्या माऱ्यापुढं कधी कधी मानवी मन विषन्न होतं. खिन्न होऊन जातं. आपण संपलो, की काय असं वाटून जातं. खूप गटांगळ्या खातं; परंतु तरीही अशा संकटातून बाहेर येण्याची जिद्द असते. कोलंबसाच्या गौरवगीताचा आदर्श असतो.
भाबड्या इच्छेला प्रयत्नांची जोड दिली जाते आणि त्या इच्छेच्या जोरावर अशक्य ते शक्य करून आयुष्य घडवलं जातं. असं आयुष्य घडवणाऱ्या मध्ये एक नाव आहे, ते म्हणजे आशिष जीव्या काठ्या
कोलंबसाच्या गर्वगीताप्रमाणं अगदी एक नवं आयुष्य उभं करणारा हा तरुण आता आपलं घर चालवतो आहे. चरी केल्हईपाडा हे त्याचं गाव. डहाणू तालुक्यातला हा आदिवासी भाग. आशिष त्याच्या जिद्दी कष्टाळू आणि लाघवी स्वभावामुळं ‘सोशल मीडिया’वर भलताच लोकप्रिय झाला आहे.
परिस्थितीला शरण न जाता मात
आशिष याची घरची परिस्थिती अतिशय गरिबीची. त्यातच वडिलांना दारूचे व्यसन. त्याला ते खपायचं नाही. रुचायचं नाही. वडिलांची कटकट घरात बसू द्यायची नाही. अशावेळी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यानं घर सोडलं. मेहुण्याकडे काही दिवस चहा बनवायला शिकला. त्यातून त्याला व्यवसायाचा नवा धडा मिळाला. तिथून बाहेर पडल्यानंतर कधी मित्रांसोबत राहत, तर कधी खोली भाड्याने घेऊन तो स्वतंत्र राहू लागला. तिथेच चहा बनवून भटकंती करून विकू लागला.
हाताची चव आणि प्रेमाची जादू
आशिषच्या हातची चव आणि त्याच्या कष्टामुळे त्याचा व्यवसाय वाढत गेला. अशात त्याच्या दिलीप हाडळ या मित्राने त्याला टपरी घेण्यासाठी वीस हजार रुपये उसने दिले. आशिषने आता डहाणू तालुक्यातील आशागड येथे जामशेत रस्त्यावर चहाची टपरी सुरू केली आहे. आता तो एकटाच व्यवसाय पाहतो. या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न तो बहिणीला देतो. आई-वडिलांना किराणासह अन्य साहित्य भरून देतो.
प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढतो व्यवसाय
बाराव्या वर्षापासून आशिषने सुरू केलेला व्यवसाय गेली सहा वर्षे प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत चालला आहे. त्याच्या चहाची कीर्ती आता सर्वदूर झाली आहे. त्याच्या हाताला असलेली चव, त्याची लाघवी वृत्ती आणि मनापासून बनवलेला चहा यामुळे त्याच्या चहाला एक आगळीच चव आली आहे. नागपूरच्या डॉली चायवाल्याचे जसे लाखो करोडो चाहते आहेत, तसेच ‘सोशल मीडिया’वर आशिषचेही चाहते आहेत. आदिवासी कुटुंबातला एक मुलगा कष्टाच्या जीवावर एक वेगळं स्थान निर्माण करतो, हे त्यानं स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिले आहे.
दररोज कमावतो दोन हजार रुपये
सुमारे ५५ ते साठ लीटर दूध चहासाठी लागते. तो एकटाच कष्ट करत असल्यामुळे इतर ठिकाणी जाऊन चहा विकणे त्याने बंद केले असून आता हातगाडीवर येणारे ग्राहक हेच त्याचे खात्रीचे ग्राहक झाले आहेत. अवघी आठवी शिकलेला आणि अजून १८ वर्षेही पूर्ण न झालेला आशिष ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून भलताच सक्रिय आहे. त्याच्या चहाची चव जिभेवर रेंगाळत असलेले अनेक लोक आता त्याची यशोगाथा इंस्टाग्रामसह अन्य ‘सोशल मीडिया’वर टाकतात आणि त्यातून त्याचे फॉलोअर्स आणि ग्राहकही वाढत आहेत. चहा विक्रीतून दररोज सुमारे चार ते पाच हजार रुपयांचा गल्ला होतो. त्यातून एक दोन हजार रुपयांची कमाई होते, असे आशिष सांगतो. त्याला चहा विकतच आणखी मोठं काही करून दाखवण्याची इच्छा आहे.
‘एक आदिवासी मुलगा आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर चहा विक्रीत आपलं एक स्वतंत्र स्थान निर्माण करतो. त्याच्या चहाची चव आता सर्वांच्या जिभेवर रुळली आहे. त्याला पाठिंबा देणे हे आमचं काम आहे.
-विलास वांगड, सामाजिक कार्यकर्ते