Lek Ladki Yojana: लाडकी बहीणनंतर आता मुलींसाठी ‘लेक लाडकी’ योजना; मिळणार तब्बल १ लाखांची मदत, कसा घेता येईल लाभ? जाणून घ्या…
ज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. परंतु याच योजनेसोबत मुलींसाठीही एक योजना राबवण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी ही योजना मुलींना आर्थिक मदत करण्यासाठी राबवण्यात आली आहे. लेक लाडकी योजना नक्की काय आहे ते जाणून घेऊया.
राज्य सरकारने १ एप्रिल २०२३ रोजी माझी कन्या भाग्यश्री या योजनेनंतर लेक लाडकी योजना सुरु केली होती. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते.मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु केली आहे.
लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
लेक लाडकी योजनेअंतर्गत पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत केली जाते. मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये दिले जातात. इयत्ता पहिलीत मुलगी गेल्यानंतर ६ हजार रुपये दिले जातात. मुलगी सहावीत गेल्यानंतर ७ हजार रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर ८ हजार रुपये दिले जातात. तसेच मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये देण्यात येईल. लाभार्थी मुलीला एकूण १ लाख १ हजार रुपये मिळतील.
योजनेच्या अटी काय?
पिवळ्या आणि केशरी रेशनधारकांच्या कुटुंबामध्ये १ एप्रिल २०२३नंतर जन्माला आलेल्या मुलींसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. एका घरातील दोन मुलींसाठी या योजनेत अर्ज करता येतो. लाभार्थी मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे
लाभार्थीचा जन्मदाखला, कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासबुक, रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळेचा दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्रे ही कागदपत्रे आवश्यक आहेत.