लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीला मोठा दणका बसला, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला, मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार पुनरागमन केलं, राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं.
महायुतीमधील तीन्ही घटक पक्षांचे मिळून राज्यात 232 उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावे लागले.
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातून अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता महाविकास आघाडीसमोर आहे.
दरम्यान पुन्हा एकदा आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नांदेडमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अंकुश देसाई व महिला तालुकाध्यक्ष तारकेश्वरी पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
दरम्यान पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते महायुतीमधील पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. महाविकास आघाडीसाठी ही पक्षगळती डोकेदुखी ठरत आहे.
काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला नाशिकमध्ये देखील मोठा धक्का बसला. नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र या पक्षप्रवेशापूर्वीच सुधाकर बडगुजर यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती, पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.