banner 728x90

अखेरचा दंडवत! अलोट जनसागराच्या उपस्थितीत अजित पवार पंचतत्त्वात विलीन

banner 468x60

Share This:

राज्याच्या राजकारणातील एक धगधगते आणि कृतीशील नेतृत्व, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात त्यांचे अकाली निधन झाले होते. आपल्या लाडक्या ‘दादां’ना अखेरचा निरोप देण्यासाठी गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्र जणू बारामतीत एकवटला होता आणि ‘अजितदादा परत या…’, ‘अजित दादा अमर रहे..’ अशा काळीज चिरणाऱ्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. अजितदादांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय यांनी त्यांना मुखाग्नी दिला.

अजित पवार बुधवारी, २८ जानेवारी रोजी सकाळी आपल्या नियोजित प्रचारसभांसाठी मुंबईहून बारामतीकडे ‘बंबार्डिअर लिअरजेट ४५ एक्सआर’ या ८ आसनी विमानाने रवाना झाले होते. सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी विमानाने उड्डाण केले, मात्र ८:४५ च्या सुमारास बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच विमानाला भीषण अपघात झाला. दाट धुक्यामुळे दोन वेळा लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात विमान कोसळले आणि स्फोट होऊन मोठी आग लागली. या दुर्घटनेत अजित पवारांसह वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, सुरक्षारक्षक विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.

आई, पत्नीची अवस्था हृदयद्रावक

या कठीण प्रसंगी अजित पवार यांच्या मातोश्री आणि पत्नी सुनेत्रा पवार यांची अवस्था अत्यंत हृदयद्रावक होती. आपल्या आयुष्याचा भक्कम आधार आणि राज्याच्या राजकारणाचा कणा असलेला माणूस असा अचानक सोडून गेल्याने दोन्ही माऊली पूर्णतः खचल्या होत्या. सुप्रिया सुळे आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांना सावरून धरले होते. ज्या मातीने या नेत्याला घडवले, त्याच मातीत आज त्यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबियांना शोक अनावर झाला होता.

banner 325x300

‘दादा’ म्हणजे बारामतीचा ‘बाप’ गेला…

अजित पवार यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचे पाहण्यासाठी पहाटेपासूनच लाखोंच्या संख्येने लोक जमा झाले होते. ‘आज दादा गेले म्हणजे बारामतीचा बाप गेला,’ अशी भावूक प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. काटेवाडीतील महिलांनीदेखील मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. आपला भाऊ आणि हक्काचा माणूस गेल्याच्या भावनेने अनेक महिलांनी हंबरडा फोडला. आयुष्यभर लोकांसाठी झटणारा हा नेता असा अचानक सोडून जाईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध जेव्हा फुटतो

अजित पवार यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी प्रथम त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले, जिथे पवार कुटुंबियांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. महाराष्ट्र पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि बिगुल वाजवून त्यांना शासकीय सलामी दिली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांनी जड अंतःकरणाने अजित पवारांना अखेरचा निरोप दिला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध फुटला. प्रत्येकाच्या मनात ‘दादा पर्व संपले’ हीच भावना दाटून आली होती.

जनसागराला शोक झाला अनावर

विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात विशाल जनसागर उसळला होता. ग्रामीण भागांसह शहरातूनही नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. शिस्तबद्ध व्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी बारामतीची तमाम जनता अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी जमली होती. सामान्य बारामतीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांना आपल्या लाडक्या अजितदादांना निरोप देताना शोक अनावर झाला होता.

मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

आपल्या लाडक्या सहकाऱ्याला आणि नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरातील आणि राज्यातील दिग्गज नेते बारामतीत दाखल झाले होते. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, छगन भुजबळ, पंकजा मुंडे, खा. संजय दिना पाटील आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.

तांत्रिक बिघाड की मानवी चूक याचा तपास सुरू

या भीषण विमान अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी डीजीसीए आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, तांत्रिक बिघाड की मानवी चूक याचा तपास सुरू आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

अजित पवार प्रवास करत असलेल्या व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या लियरजेट-४५ एक्सआर विमानाचा अपघात झाल्यानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) ताब्यात घेतला आहे. अपघातावेळी नेमके काय घडले? हा अपघात कशामुळे घडला? याबाबतची माहिती आता लवकरच समोर येईल. मात्र, यावेळी पायलट आणि को-पायलट यांनी शेवटचे शब्द ‘ओह शिट’ असल्याचे ऐकू आले होते, असे असे डीजीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले. एअरपोर्ट अथॉरिटी, पोलिस फॉरेन्सिक पथक, डीजीसीए आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) यांच्या विशेष टीमने घटनास्थळी दाखल होत तांत्रिक तपास सुरू केला.

तीन सदस्यांचे पथक करणार चौकशी

बारामतीजवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघातानंतर, सर्व तपास यंत्रणा तत्काळ सक्रिय करण्यात आल्या आहेत. सखोल, पारदर्शक आणि कालबद्ध चौकशी सुनिश्चित करणे हे सर्वोच्च प्राधान्य आहे. एएआयबी, दिल्ली येथील तीन अधिकाऱ्यांचे एक पथक आणि डीजीसीए, मुंबई प्रादेशिक कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांचे आणखी एक पथक बुधवारीच अपघातस्थळी पोहोचले आहे. एएआयबीचे महासंचालकदेखील त्याच दिवशी घटनास्थळी पोहोचले. तपास जलदगतीने सुरू आहे, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाकडून देण्यात आली. संबंधित लिअरजेट विमानात सॅटेलाइट-आधारित आधुनिक सुरक्षा प्रणाली बसवण्याची अंतिम मुदत केवळ २८ दिवसांनी चुकली होती. खराब हवामानात लँडिंगसाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरू शकली असती, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कॅप्टन सुमित मद्यपानामुळे तीन वर्षे होता निलंबित

अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानाचे सारथ्य ज्यांच्याकडे होते, ते पायलट कॅप्टन सुमित कपूर यांची कारकीर्द काहीशी वादग्रस्त आणि डागाळलेली असल्याची माहिती समोर येत आहे. आकाशात १६ हजार तासांपेक्षा जास्त विमान उड्डाणाचा अनुभव असला तरी सुमित कपूर यांच्यावर दोन वेळा मद्य सेवन केल्यामुळे कारवाई करण्यात आली होती. १३ मार्च २०१० रोजी दिल्ली-बंगळुरू विमानाचे सारथ्य करण्याआधी केलेल्या ब्रेथ ॲॅनलायझर चाचणीत ते दोषी आढळले होते. अल्कोहोल घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित एअरलाइन्सने त्यांची सेवेतून हकालपट्टी केली होती. त्यानंतर ७ एप्रिल २०१७ रोजी दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाआधी त्यांनी पुन्हा मद्यपान केल्याचे अल्कोहोल चाचणीत सिद्ध झाले. दुसऱ्यांदा दोषी आढळल्यामुळे नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित केले. त्यानंतर त्यांनी फ्रीलान्स पायलट म्हणून काम पाहिले. गेल्या पाच वर्षांपासून ते व्हीएसआर व्हेंचर्समध्ये पायलट म्हणून कार्यरत होते. आता, बारामतीतील विमान अपघातानंतर त्यांची संपूर्ण पार्श्वभूमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामुळे विमान वाहतूक सुरक्षा आणि वैमानिकांच्या तंदुरुस्तीच्या नियमांवरही गंभीर प्रश्न निर्माण केले जात आहेत.

मोदी-फडणवीसांनी दादांवरील आरोप मागे घ्यावेत – संजय राऊत

अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भाजपने गुरूवारी अनेक वृत्तपत्रांमध्ये पानभर जाहिराती दिल्या. पण त्याने काय होणार? केवळ जाहिराती देऊन सहानुभूती दाखवणे हा श्रद्धांजलीचा खरा अर्थ नाही. अजित पवार यांच्यावर जिवंतपणी गंभीर आर्थिक आरोप करणाऱ्यांनी आता अचानक श्रद्धांजली देणे हे राजकीय दुटप्पीपणाचे लक्षण आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!