आम्ही एकमेकांचे वैचारिक विरोधक आहोत, शत्रू नाहीत. त्यामुळे एखाद्याच्या जन्मदिनाप्रसंगी एखाद्याने चांगली भावना व्यक्त करणे याचा अन्यथा अर्थ काढणे अतिशय अयोग्य आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
त्यांच्या जन्मदिनानिमित्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी दिलेल्या शुभेच्छांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रात आम्ही एकमेकांचे वैचारिक विरोधक आहोत, शत्रू नाहीत. त्यामुळे एखाद्याच्या जन्मदिनाप्रसंगी एखाद्याने चांगली भावना व्यक्त करणे याचा अन्यथा अर्थ काढणे अतिशय अयोग्य आहे. महाराष्ट्रात एका चुकीच्या संस्कृतीला आपण पुढे करतो आहोत का, असा याचा अर्थ निघेल. त्यामुळे याला एवढ्याच परिपेक्ष्यात बघितले पाहिजे की, माझ्या जन्मदिनाच्या निमित्ताने काही लोकांनी पुस्तक प्रकाशित केले. त्यांनी महाराष्ट्रातील या दोन्ही मोठ्या नेत्यांना प्रतिक्रिया मागितली. त्यांनी प्रतिक्रिया दिली, त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पण याचा अन्य अर्थ काढणे खूपच संकुचित होईल, असे मला वाटते,” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र नायक’ हे कॉफी टेबल बुक प्रकाशित झाले. या पुस्तकात शरद पवार यांनी लिहिलेल्या लेखात फडणवीस यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहून मला माझा पहिला मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आठवतो. ही गती त्यांनी माझ्या वयापर्यंत कायम ठेवावी आणि ती आणखी वृद्धिंगत होत राहावी, अशी शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त देतो,” असे म्हणत शरद पवार यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. तसेच “महाराष्ट्राच्या राजकारणात गंगाधरराव फडणवीस यांनी आदर्श राजकारणी म्हणून ठसा उमटवला. हा वारसा देवेंद्र फडणवीस समर्थपणे आणि मेहनतीने पुढे नेत आहेत. भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे,” अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.