पालघर-योगेश चांदेकर
एक वर्षापासून पाणी योजनेचे पंप गायब अभियंता प्रशांत इंगळे यांनी पाणीपुरवठा विभागाला लुटले?
पालघरः केळवा-माहीम प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेमधील पाणी योजनेच्या दुरुस्तीच्या नावाखाली सुमारे पाच लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपाची आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेतील यांत्रिकी कक्ष व देखभाल दुरुस्ती विभागाचे उपअभियंता एम.ए. ठाकरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांना दहा दिवसांत चौकशी अहवाल पालवे यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे; परंतु चौकशीचे आदेश होऊन चार दिवस झाले, तरी अजून चौकशी अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाच्या चौकशीला प्रारंभ केलेला नाही. त्यामुळे चालढकल तर केली जात नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
केळवा-माहीम प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पंप हाऊसमधील विजेच्या उपकरणाच्या दुरुस्तीच्या नावाखाली चार लाख ९४ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला असून जुने दोन कंट्रोल पॅनल चालू स्थितीत असतानाही दुरुस्ती दाखवण्यात आली. प्रत्यक्षात चौकशी केली असता प्रकाश वर्मा या कर्मचाऱ्याने २०२१ नंतर केळवा-माहीम पाणीपुरवठा योजनेच्या कंट्रोल पॅनलमध्ये काहीही दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे सांगितल्याने या योजनेत खोटी दुरुस्ती दाखवून सुमारे पाच लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावर शिक्कामोर्तब झाला आहे? या योजनेची दुरुस्ती करण्याची आवश्यकता होती, तर नियमानुसार दुरुस्ती का सादर करण्यात आली नाही. याशिवाय कंट्रोल पॅनल खरेदीची पावती दाखल करणे आवश्यक होती; परंतु तसे न केल्यामुळे ही दुरुस्ती संशयास्पद होती. त्यामुळे आता या सर्वच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चौकशी बाबत संभ्रम
केळवे-माहीम पाणी योजनेच्या गैव्यवहार प्रकरणी चौकशीची जबाबदारी ज्या ठाकरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे ते इंगळे यांचे सहकारी मित्र असल्याचे बोले जात असून खरच चौकशी होणार का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यामुळे आता या चौकशीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात या योजनेतील एका मागून एक गैरव्यवहार उघडकीस येत असल्याने आता या योजनेच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इंगळे यांचे ठेकेदारासोबत संगनमत
केळवा-माहीम पाणीपुरवठा योजनेत किती पंप चालू आहेत, दुरुस्तीसाठी किती गेले आहेत, याची माहिती आता ठाकरे त्यांच्या चौकशीच्या वेळी करतील. कंट्रोल पॅनेल किती आहेत, याचीही ते नोंद घेतील. या कामात तत्कालीन अभियंता प्रशांत इंगळे यांच्या काळात गैरव्यवहार झाला असून त्यांनी क्रिंजल इलेक्ट्रिकल या कंपनीच्या ठेकेदारासोबत संगनमत करून गैरव्यवहार केल्याने आता या दोघांवरही चौकशीची टांगती तलवार कायम आहे. पालवे यांच्या आदेशात तसे स्पष्ट नमूद केले आहे.
आणखी एक गैरव्यवहार
दरम्यान केळवे-माहीम व १७ गावातील पाणीपुरवठा योजनेतील आणखी एक घोटाळा उघड झाला असून इंगळे यांच्या एकूण कामाच्या पद्धतीविषयी संशय निर्माण झाला आहे. केळवा-माहीम योजनेच्या नोंदवहीत आढळलेल्या नोंदीनुसार हे पंप पाच ऑगस्टपर्यंत २०२४ पर्यंत दुरुस्त होऊन आलेच नसल्याचे स्पष्ट झाले आहे; मात्र या कामावर जुलै २०२४ मध्ये दुरुस्त होऊन आल्याचे भासवून सुमारे पाच लाख रुपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे.
गेल्या वर्षापासून पंप परत आले नाहीत
गेल्या एक वर्षापासून दुरुस्तीसाठी गेलेले पंप अजूनही परत आले नसल्याने हे पंप क्रिंजल इलेक्ट्रिकल कंपनीला अभियंता प्रशांत इंगळे यांनी परस्पर विकले की काय? असा प्रश्न आता उपस्थित होत असून. जनतेच्या पाणीपट्टी स्वरूपात जमा झालेल्या पैशाचा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रशांत इंगळे व ठेकेदार यांनी कशाप्रकारे अपहार केला. हे आता उघड होत असून याप्रकरणीही आता पालवे यांनी चौकशी करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
गंभीर प्रकरणाबाबत चालढकल
केळवा-माहीम योजनेच्या उपसा सिंचन योजनेबाबत आरोपामागून आरोप होत आहेत. त्यांतील काही आरोप सकृतदर्शनी सिद्ध होत आहेत. इतक्या गंभीर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पालवे यांनी दिल्यानंतर लवकर चौकशीला सुरुवात होणे अपेक्षित असताना अजूनही चौकशीला सुरुवात का झाली नाही, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. चौकशीला चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यावर अंकुश ठेवण्याची मागणी होत आहे.