पालघर-योगेश चांदेकर
आश्रम शाळातील विद्यार्थी रात्री उशिरापरर्यंत उपाशी
जेवण घेऊन जाणारी पिकअप पलटी
तातडीच्या पर्यायी व्यवस्थेचा अभाव
पालघरः डहाणू तालुक्यातील कासा सायवन रस्त्यावरील बापूगाव येथे शासकीय आश्रमशाळांना जेवण घेऊन जाणारी पिकप पलटी झाली आहे. त्यामुळे तीन आश्रम शाळातील विद्यार्थ्यांना उपाशी राहण्याची वेळ आली. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत पर्यायी व्यवस्था झाली नसल्याने विद्यार्थ्यांना भोजन मिळाले नव्हते.
डहाणू तालुक्यातील सायवन आणि दाभाडी चळणी या तीन आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमधून भोजन पुरवले जाते. बोईसरमधील कांबळगाव, बेटेगाव येथून भोजन घेऊन ही पिकअप निघाली होता. डहाणू तालुक्यातील बापूगाव येथे ती पलटी झाली. संध्याकाळी सहा वाजता हा अपघात झाला. त्यातील जेवण रस्त्यावर सांडले.
नागरिकांकडून प्रशासनाला माहिती
बापूगाव येथे हा अपघात झाल्याची माहिती समजताच तात्काळ. डहाणू पंचायत समितीचे सभापती प्रवीण गवळी यांनी ही माहिती आदिवासी विकास प्रकल्प विभागाला कळवली. ‘सेंट्रल किचन’ मधून भोजन घेऊन निघालेली पिकअप पलटी झाल्यानंतर तातडीने दुसरे वाहन पाठवून भोजनाची व्यवस्था करता आली असती; परंतु शासकीय आश्रमशाळांकडे पाहण्याचा सरकारी दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही. त्यातच संबंधित ठेकेदार कंपनीने तातडीने अन्य मार्गाने पर्यायी भोजनाची व्यवस्था करणे अपेक्षित असताना तसे झाले नाही
पर्यायी व्यवस्थेचा अभाव
डहाणूचे आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी मधुकर जागले यांना डहाणू पंचायत समितीचे सभापती प्रवीण गवळी यांनी कासा सायवन रस्त्यावरील बापूगाव येथे झालेल्या अपघाताची माहिती दिली. विद्यार्थ्यांना लवकरच भोजन पोहोचेल असे सांगण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात ते कधी पोहोचेल याची शाश्वती नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जेवणावाचून राहावे लागले. त्यामुळे पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून अपघात किंवा अन्य प्रासंगिक घटकांच्या वेळी विद्यार्थ्यांना पर्यायी भोजन व्यवस्थेची सोय करणे आवश्यक असल्याचे या निमित्ताने सिद्ध झाले आहे.
उशिरापर्यंत मुले उपाशी
वाहन निघाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली असली, तरी रात्रीसाडेनऊ वाजेपर्यंत दोन्ही आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना भोजन पोचले नव्हते. त्यामुळे मुले उपाशी होती.