पालघर-योगेश चांदेकर
अनियमता दाखवून मोठ्या शिक्षेपासून सरंक्षण?
पालघरः केळवा माहीम पाणी योजनेचे मे ते ऑगस्ट २०२३ या काळात एकही पंप दुरुस्त न करता त्यावर पाच लाख रुपयांचे बिल जुलै २०२३ मध्येच काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणात पुरावे हाती असतानाही गैरव्यवहार करणाऱ्या अभियंता प्रशांत इंगळे यांना पाठीशी घातले जात असल्याचे समजते. केवळ अनियमितता दाखवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे टाळले जात आहे.
या प्रकरणात इंगळे यांना त्यांचे मित्र असलेल्या चौकशी अधिकारी एम. ए. ठाकरे यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचे अहवालातील किरकोळ ठपक्यावरून स्पष्ट होत आहे. जिल्हा परिदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनीच आता नियमाचा बडगा दाखवून कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
दुरुस्ती, खरेदी न करता पाच लाखांना चुना
केळवा-माहीम पाणीपुरवठा योजनेच्या कंट्रोल पॅनल स्टार्टरची दुरुस्ती केली नाही. तो नवीन खरेदी केला नाही, असा जबाब पाणीपुरवठा कर्मचारी प्रकाश वर्मा यांनी दिला आहे. केळवा-माहीमच्या सरपंचांनीही याबाबत तक्रार केली असताना इंगळे यांच्यावर कठोर कारवाई करून गैरव्यवहारा बाबत कारवाई करणे अपेक्षित आहे मात्र केवळ अनियमतता दाखवून त्यांना पाठीशी घातले जात असल्याचे सांगण्यात येते.
चौकशीच संशयाच्या भोवऱ्यात
केळवा-माहीम पाणीपुरवठा योजनेच्या चौकशीसाठी जेव्हा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली, तेव्हाच इंगळे यांना पाठीशी घातले जाईल, अशी चर्चा होती. त्याचे कारण ठाकरे आणि इंगळे यांच्यातील मैत्री संबंध. असे असतानाही ठाकरे यांच्यावर चौकशीची जबाबदारी दिल्यामुळे ही चौकशी सुरुवातीपासून संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यातच ठाकरे हे इंगळे आपल्यावर दबाव आणत असल्याचे खासगीत सांगत होते; मात्र त्यांचा अहवाल पाहिला तर मैत्रीच्या दबावाला ते बळी पडले, की काय अशी शंका निर्माण होते.
पुरावे समोर, तरीही पाठराखण?
इंगळे यांनी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आदिवासी विभागात काम करत नसतानाही आदिवासी विभागातील पगार काढला. या प्रकरणातही त्यांनी सुमारे साडेचार वर्ष अतिरिक्त रक्कम घेतली असून ती वसूल करण्यात बाबतचे पत्र जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाठवले आहे. इतके गंभीर प्रकार इंगळे यांनी केले असताना त्यांच्या बाबतीत कारवाईसाठी चालढकल का केली जात आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. इंगळे यांची एकामागून एक गैरव्यवहाराची प्रकरणे उघडकीस येत असल्याने त्यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करणे अपेक्षित आहे; परंतु एका मागून एक पुरावे समोर येत असतानाही त्यांच्या बाबतीत फक्त अनियमितता दाखवून त्यांना पाठीशी का घातले जात आहे, असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे दरम्यान जर खरोखरच इंगळे यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असेल तर काही गंभीर व महत्वाचे पुरावे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत. जर ठाकरे यांनी इंगळे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर यामध्ये चौकशी अधिकारी ठाकरे हेही अडचणीत येऊ शकतात.त्यामुळे एकूणच ठाकरे यांनी केलेली चौकशी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे .