पालघर-योगेश चांदेकर
पालघर येथे ‘ईएसआयसी’ हॉस्पिटल उभारण्यास तत्वतः मान्यता
खासदार हेमंत सवरा यांच्या प्रयत्नांना यश
क्रीडा संकुलासाठी पाच कोटी देण्याचे आश्वासन
पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय कामगार, रोजगार आणि क्रीडामंत्री मनसुख मंडविया यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पालघर येथे कामगारांसाठी ‘ईएसआयसी’ रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली. पालघरला पाच एकर जागा उपलब्ध असून ती जागा देण्याची तयारी डॉ. सवरा यांनी दाखवल्यानंतर मंत्र्यांनी पालघरला ‘ईएसआईसी’ रुग्णालय सुरू करण्यास तत्वतः मान्यता दिली.
डॉ. सवरा यांनी दिल्लीत कामगार, रोजगार आणि क्रीडा मंत्री मंडविया यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. तसेच त्यांच्यांशी हे प्रश्न कसे सुटू शकतील, यावर चर्चा केली. डॉ. सवरा यांनी मंडविया यांना पालघर येथे रुग्णालयाच्या उपलब्धतेची किती गरज आहे, हे पटवून दिले.
दहा लाख कामगार; परंतु रुग्णालय नाही
पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी पाच हजार उद्योग आहेत. सुमारे दहा लाख कामगार येथील वेगवेगळ्या उद्योगात काम करीत आहेत; परंतु त्यांच्यासाठी ‘ईएसआयसी’ रुग्णालय पालघरला नाही. त्यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपचार मिळत नाहीत. पालघर हे जिल्ह्याचे नवीन ठिकाण असून या ठिकाणी रुग्णालय आणि आरोग्य सेवांची कमतरता आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना जादा खर्चाचे उपचार घ्यावे लागतात.
आदर्श रुग्णालय बांधणार
आदिवासी आणि दुर्गम जिल्हा असल्याने केंद्र सरकारने या जिल्ह्यासाठी रुग्णालय मंजूर करावे असे साकडे डॉ. सवरा यांनी मंडविया यांना घातले. आरोग्यमंत्र्यांनी डॉ. सवरा यांची सूचना तातडीने मान्य करून एक आदर्श असे रुग्णालय पालघर येथे बांधण्यास तत्त्वतः मंजुरी दिली. पालघर जिल्ह्यातील कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची तसेच अन्य रुग्णांची तातडीची गरज लक्षात घेऊन रुग्णालय उभारण्यास सुरुवात करण्याची डॉ. सवरा यांची मागणी मंडविया यांनी मान्य केली.पालघर तालुक्यातील कुंभवली एकलारे येथे पाच एकर जागा उपलब्ध असून अन्य सर्व विभागांच्या मान्यता प्राप्त झाल्याची माहिती खा. सवरा यांनी मंत्र्यांना दिली.
क्रीडा संकुलावरही चर्चा
मंडविया हे केंद्रीय क्रीडामंत्री आहेत. डॉ. सवरा यांनी पालघर जिल्ह्यात क्रीडा पायाभूत सुविधा नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले. केंद्र सरकार एकीकडे ‘खेलो इंडिया’ हा राष्ट्रीय कार्यक्रम राबवीत असताना पालघर या जिल्ह्याच्या ठिकाणी मात्र क्रीडा संकुल नसल्याचे त्यांनी सांगितले. क्रीडा संकुल व अन्य पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी डॉ. सवरा यांनी क्रीडामंत्र्यांकडे केली. पालघर हा आदिवासी जिल्हा असून या ठिकाणचे आदिवासी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात भाग घेत असतात. आदिवासी युवक मूलतः काटक आणि चपळ असतात. त्यांच्या नैपुण्याला आणि कौशल्याला वाव देण्यासाठी येथे क्रीडा संकुल तसेच अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध नाही, असे निदर्शनास आणून पालघर येथे अत्याधुनिक क्रीडा सुविधा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी डॉ. सवरा यांनी केली आहे. क्रीडा संकुलासाठी पाच कोटी रुपये देण्याचे आश्वासन मंत्र्यांनी खा. सवरा यांना दिले.