मुंबईसह राज्यात मराठीचा मुद्दा चांगलाच तापलेला पाहायला मिळत आहे. मीरा-भाईंदरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी 2 मराठी भाषा न बोलल्याच्या कारणावरून एका व्यापाऱ्याला मराठी भाषेचा अपमान केल्याच्या आरोप करून मारहाण केली होती.
या व्यापाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मीरा-भाईंदरमध्ये तणावाचं वातावरण तयार झाले होतं. मीरा भाईंदरमधील या व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. तसेच, मराठी भाषेचा अभिमान असणं चुकीचं नाही, पण भाषेच्या नावाखाली गुंडगिरी, मारामारी खपवून घेणार नाही. भाषेवरुन वाद घालणाऱ्या, मारहाण करणाऱ्या आणि गुंडशाहीवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारने हिंदी सक्तीच्या निर्णयाचा जीआर मागे घेतल्याच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्रिभाषासूत्रीचा निर्णय स्वीकारणारे उद्धव ठाकरेचन, त्यात उपनेत्याला ढकलणारे तेच, निर्णय कॅबिनेटमध्ये घेणारे तेच समिती नेमणारे देखील तेच आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंवर टीका केली. आम्ही याबाबत समिती नेमलेली आहे, त्याचा जो अहवाल येईल त्याची अंमलबजवाणी केली जाईल, जी विद्यार्थ्यांच्या हिताची असेल. मुंबईत भाषेवरून व्यक्तींना होत असलेली मारहाण सहन केली जाणार नाही, आम्हालाही मराठी भाषा प्रिय आहे. पण, भाषेवरुन गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असे फडणवीसांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिल्याचं पाहायला मिळाले यावत प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले गुजराती कार्यक्रमात गेल्याने जय गुजरात बोलल्याने संकुचित विचारातून टिका करणे शोभत नाही. सध्या विरोधकांकडे मुद्देच राहिले नाहीत, ज्यामुळे ते असे मुद्दे उचलतात. मला मराठीत बोलायच तर मी मराठीत बोलीन, पण दुराग्र कोणी करू शकत नाही. मागे पवारसाहेब कर्नाटकातील चिकोडी येथे जय कर्नाटक बोलले होते, तर त्यांना महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकवर जास्त प्रेम आहे अस म्हणायच का? अस फडणवीस म्हणाले.
मीरा भायंदर येथील व्यापाऱ्यास मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. एखादा मराठी व्यापारी आसाममध्ये जाऊन भाषा शिकायला वेळ लागत असेल तर त्याला मारहाण करणार का, असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला. खरा अभिमान असेल तर मराठी भाषा शिकवा, क्लासेस घ्या, इंग्रजीला का मग गळे लावता. स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकायचं आणि मराठीसाठी गळा काढायचा, असे म्हणत ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्षपणे टीका केली.