पालघर-योगेश चांदेकर
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाटेवर
विधानसभेला उमेदवारी न मिळाल्याने नाराज
पालघरः पालघर विधानभेची उमेदवारी जिल्हा परिषदेचे सदस्य जयेंद्र दुबळा यांना दिल्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या भारती कामडी नाराज असून, त्यांनी पक्षाचे काम थांबवले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची चर्चा झाल्याचे बोलले जात असून त्या लवकरच पुन्हा धनुष्यबाण हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर पालघर जिल्हा परिषदेच्या ३७ सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले. त्या वेळी कामडी मात्र ठाकरे गटातच थांबल्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. लोकसभा मतदारसंघाच्या त्या संघटक होत्या. लोकसभेला लढण्यासाठी त्यांनी प्रथम दोन वेळा नकार देवूनी पालघर विधानसभा लढण्याची इच्छा शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या समोर व्यक्त केली होती.
लोकसभेऐवजी विधानसभा लढवायची होती इच्छा
आपण पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून लोकसभेचा खर्च आपल्याला परवडणारा नाही, अशी भूमिका त्यांनी त्या वेळी घेतली होती, असे समजते; परंतु पालघर विधानसभा मतदारसंघातून जयेंद्र दुबळा यांना उमेदवारी देण्यासाठी कामडी यांचा पालघर विधानसभा मतदारसंघातून पत्ता कट करून लोकसभेला उमेदवारी देण्यात आली, पालघर जिल्ह्यात पालघर विधानसभा मतदारसंघात कामडी यांचे पारडे जड असल्याचे प्रत्येकाकडून बोलले जात असताना त्यांना उमेदवारी पासून वंचित ठेवल्याचा आरोप आता त्यांचे समर्थक करत आहेत.
चार लाखांहून अधिक मते
पालघर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोनच आमदार असताना कामडी यांनी चार लाख १७ हजार ९३८ मते मिळवली होती. भाजपच्या डॉ. हेमंत सवरा यांनी त्यांचा पराभव केला. पालघर लोकसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार असतानाही शिवसेनेच्या कामडी यांनी चांगली लढत दिली. पुरेशी संसाधने आणि आर्थिक तरतूद नसतानाही त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. असे असतानाही पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेदवारांची नावे निश्चित करताना आपल्याला विश्वासात घेतले नाही, याची खंत कामडी यांना आहे. उमेदवारी कोणाला द्यावी हा पक्षश्रेष्ठींचा अधिकार असला, तरी ज्याने लोकसभा मतदारसंघात चांगली लढत दिली, त्या उमेदवाराला किमान विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देताना विश्वासात घ्यावे असे पक्षाला वाटले नसल्याची नाराजी त्यांच्या समर्थकांची आहे. त्यामुळे पालघरमधून दुबळा यांची विधानसभेला उमेदवारी निश्चित झाल्यानंतर कामडी यांनी पक्षाचे काम थांबवले आहे.
ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता
पक्षात आपण डावलले गेलो असल्याची भावना त्यांची झाली असून प्रचारापासूनही त्या अलिप्त आहेत. त्यांच्या समर्थकांशी त्यांनी चर्चा केली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा शिंदे गट असे दोन पर्याय त्यांच्या समोर आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यांशी संपर्क साधला आहे. असे असले तरी मुख्यमंत्री शिंदे यांच्यांशी त्यांची चर्चा झाली आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. कामडी शेकडो कार्यकर्त्यांसह लवकरच शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला दोनच दिवसापूर्वी खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला असताना आता उद्धव ठाकरे गटाला कामडी यांच्या ‘जय महाराष्ट्र’चा मोठा धक्का बसणार आहे.