banner 728x90

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाचा नवा पॅटर्न

banner 468x60

Share This:

इयत्ता दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नवा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक आता दुसऱ्या शाळा-महाविद्यालयातील असणार आहेत.

पाच ते सात किमी अंतरावरील शाळांमधील शिक्षक विविध परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षक असतील. वेळप्रसंगी जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे.

banner 325x300

पुणे बोर्डाने मागील वर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘सरमिसळ पद्धती’चा अवलंब केला. त्यानुसार एका परीक्षा केंद्रावर पाच किमी अंतरावरील विविध शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी बसविले. मात्र, परीक्षा केंद्रांवरील बहुतेक पर्यवेक्षक त्याच शाळेतील असल्याने कॉपी प्रकाराला पूर्णत: आळा बसला नसल्याचे दिसून आले.

शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे बंधन घातले, मात्र अजूनही ६० टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत किंवा ते नावालाच असल्याची वस्तुस्थिती आहे. शेकडो विद्यार्थ्यांनी जेईई, नीट अशा परीक्षांच्या तयारीसाठी खासगी कोचिंग क्लास लावले आणि प्रवेशित महाविद्यालयांमध्ये ते गेलेच नाहीत, अशीही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर बोर्डाने आता कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावरील पर्यवेक्षक, केंद्र संचालकच बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

पर्यवेक्षक अन्‌ केंद्र संचालक दुसऱ्या शाळेतील असतील

कॉपीमुक्त परीक्षेसाठी आता ज्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र आहे, तेथील शिक्षक त्याच केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून नेमले जाणार नाहीत. एका केंद्रावरील शिक्षक दुसऱ्या केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून नेमले जाणार आहेत. काही ठिकाणी एकच केंद्र असल्यास त्या केंद्रावर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक पर्यवेक्षक म्हणून नेमण्याचे नियोजन आहे. केंद्र संचालकही दुसऱ्याच शाळेतील असतील.

– औदुंबर उकिरडे, सचिव, पुणे विभागीय मंडळ

बोर्डाचा नवा पॅटर्न असा…

शहरातील परीक्षा केंद्रांवर ५ ते ७ किलोमीटर अंतरावरील ग्रामीणमधील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून नेमले जाणार आहे. शिक्षकांना केंद्रांवर जाण्यासाठी फार वेळ लागणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. वेळप्रसंगी महापालिका शाळांमधील शिक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे. गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी कॉपीमुक्त परीक्षेसाठी हा पॅटर्न राज्यभर राबविला जाणार आहे. ग्रामीणमधील परीक्षा केंद्रांवर देखील पाच ते सात किमी अंतरावरील शाळांचे शिक्षक दुसऱ्या केंद्रांवर पर्यवेक्षक म्हणून काम करतील. ते शिक्षक (पर्यवेक्षक) विद्यार्थ्यांच्या फार ओळखीचे नसतील, याची खबरदारी घेतली जाणार आहे.

बोर्ड परीक्षेसंदर्भात ठळक बाबी…

इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत पार पडेल

बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरु होईल व १८ मार्च रोजी संपेल

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा ३ ते २० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल

दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चपर्यंत चालणार आहे

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!