राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादीसह राज्याच्या राजकारणातही मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांतही या दुर्घटनेचा आणि अजित पवारांच्या नसण्याचा परिणाम होईल, अशी चर्चा स्थानिक स्तरावर होत आहे.
दुसरीकडे पवार कुटुंबीय देखील दु:खातून सावरत राजकीय पाऊले टाकत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा यांनी आज साताऱ्याच्या कराडमधील प्रितीसंगम येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच, अजित पवारांसमवेत विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यामुळे, आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) मंत्रालयात कधी जाणार याची माहिती समोर आली आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी दुर्दैवी अपघाती निधन झाले, अजित पवार यांच्यावर शोकाकुल वातावरणात बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांचे अस्थिकलश संपूर्ण राज्यभरात कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी पाठवण्यात आले आहेत. त्यानुसार, आज राज्यातील विविध जिल्ह्यात अजित पवारांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी, अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे बारामतीतही आज पवार कुटुंबीयांच्या सांत्वनसाठी राज्यभरातून कार्यकर्ते पदाधिकारी येत आहेत. त्यासाठी, सुनेत्रा पवार याही बारामतीत आहेत. उद्या मंत्रालयात होणारी मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलण्यात आली आहे, त्यामुळे या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक होणार नाही.
सुनेत्रा पवार 9 फेब्रुवारीला मंत्रालयात
राज्य मंत्रिमंडळाची बैठक दर मंगळवारी होत असते, मात्र उद्याची बैठक होणार नसल्याची माहिती आहे. अजित पवारांचे दु:खद निधन आणि राज्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्याची मंत्रिमंडळ बैठक होणार नाही. त्यामुळे, या बैठकीला नवनिर्वाचित उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहतील काय, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यात दौरा करणार आहेत. तर, 9 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात उपस्थित होणार आहेत, अशी माहितीही सूत्रांकडून मिळाली. दरम्यान, आज बारामतीत पवार कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी अजित दादा प्रेमी, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.
















