पालघर-योगेश चांदेकर
चार तास एकाच ठिकाणी ताटकळण्याची वेळ
लांब पाल्यांच्या गाड्यांची दुरवस्था
पालघरः एकीकडे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचा अभ्यास करून राज्यात त्याच धर्तीवर परिवहन महामंडळाचा कारभार करण्याचे जाहीर केले असताना राज्य परिवहन महामंडळाच्या अब्रूची लक्तरे दररोज वेशीवर टांगली जात आहेत. शिवशाही तसेच स्लीपर गाड्याही वारंवार बंद पडत असून स्थानिक पातळीच्या गाड्यांची तर फारच दुरवस्था झाली आहे. बोईसर येथून सांगली जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथे जाणाऱ्या स्लीपर गाडीमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांना चार तास एकाच ठिकाणी थांबून राहावे लागले. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला.
राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक गाड्यांची मुदत संपली आहे. सुमारे २२ हजार गाड्यांची आवश्यकता असताना १४ ते १५ हजार गाड्यांवर एसटी महामंडळाचा कारभार चालू आहे. त्यातील काही गाड्या तर अतिशय वाईट स्थितीत आहेत. लोंबकळणारा पत्रा, खळखळ वाजणारे दरवाजे, फाटलेस्या सीटस् असे प्रकार एसटीच्या बाबतीत दिसून येतात. खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करताना एसटी महामंडळाच्या गाड्यांच्या दुरवस्थेकडे मात्र फारसे कुणाचे लक्ष नाही. वारंवार गाड्या मध्येच बंद पडलेल्या दिसतात.
गाड्या सुरू करण्यात उत्साह, स्थितीबाबत निरुत्साह
किमान लांब पडल्याच्या गाड्या तरी चांगल्या आणि सुस्थितीत असाव्यात, अशी अपेक्षा असताना या गाड्याही खराब स्थितीत असतात. त्यात राज्य परिवहन महामंडळाने भाडेतत्त्वावर घेतलेल्या शिवशाही गाड्यांच्या तर देखभालीकडे कुणाचेच लक्ष नाही. भाडेपट्ट्यावर असलेल्या गाड्यांची दुरुस्ती कोणी करायची, हा ही प्रश्नच असतो. अनेकदा या गाड्यांनी पेट घेतल्याची उदाहरणे वारंवार दिसतात. समाजमाध्यमांत दररोज लांबपल्ल्याची एकतरी गाडी सुरू केल्याचे वाचायला मिळते; परंतु मोजक्याच नव्या गाड्या लांबपल्ल्याच्या मार्गावर जातात. उर्वरित गाड्या अस्वच्छ,नादुरुस्त असतात.
कंत्राटीकरणाच्या नादात एसटीचा खेळ
राज्य परिवहन महामंडळात पूर्वी एसटी स्वतःची असायची. दुरुस्तीसाठी महामंडळाचेच कर्मचारी असत. आगारातून एसटी बाहेर काढताना ती स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत असल्याची खात्री केली जायची. महामंडळाचे स्वतःचे कर्मचारी असताना उत्तरदायित्वाची भावना होती. आता बहुतांश कामांचे खासगीकरण झाले असल्याने जबाबदार कुणाला धरायचे, असा प्रश्न पडतो.
प्रवाशांचा प्रतिसाद, बस मात्र जुनाट
बोईसर येथून दररोज सायंकाळी साडेपाच वाजता सुटणाऱ्या नृसिंहवाडी बसला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद आहे. ही स्लीपर गाडी आहे. सुमारे सहाशे किलोमीटरचे अंतर असल्याने या गाडीचे आगाऊ बुकिंग करून प्रवास करण्यास प्रवाशी पसंती देतात; परंतु या मार्गावर वारंवार प्रवास कराव्या लागणाऱ्या प्रवाशांनी त्या गाडीच्या एकूण स्थितीबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. मध्येच पंक्चर होणे, मध्येच बिघाड होणे, कधी डिझेल गळती अशा स्वरूपाच्या तक्रारी या गाडीबाबत असतात.
दुरुस्तीसाठी चार तास
आज सायंकाळी साडेपाच वाजता बोईसरहून निघालेली गाडी पालघरला आल्यानंतर तिच्यात बिघाड झाल्याचे लक्षात आले. डिझेल गळती होत होती. त्यामुळे या गाडीची दुरुस्ती कार्यशाळेत करण्यात आली. पालघर विभागाकडे स्लीपर गाड्यांचे प्रमाण फारसे नाही तसेच या गाडीचे सुट्टे भाग मिळत नसल्याने गाडी बिघडली, तर ती दुरुस्त करायला वेळ जातो. आजही सांगली, सातारा, पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना गाडीत बिघड झाल्यामुळे प्रवाशांना चार तासाहून अधिक काळ पालघर येथे थांबून राहावे लागले. रात्री सव्वा नऊ नंतर ही गाडी नृसिंहवाडीच्या दिशेने रवाना झाली.
नफ्याचा विचार, सुविधेचा विसर
बोईसर वरून सुटणारी ही गाडी पालघर, मनोर, ठाणे, पनवेल, स्वारगेट, सातारा मार्गे सांगलीला जाते. अतिशय फायद्याच्या असलेल्या या गाडीकडे केवळ नफ्याच्या भूमिकेतून पाहताना प्रवाशांच्या सुविधांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे गाडीत बिघाड झाला, की प्रवाशांचा संताप होतो. त्यातच बोईसर होऊन सातारा, सांगली कडे जाणाऱ्या एकट्या महिलांचे प्रमाणही मोठे असते. रात्री गाडीत बिघाड झाला, की महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते.
गाड्या वाटपातही असमतोल
ही गाडी सकाळी साडेसात वाजता नृसिंहवाडीला पोहोचत असते. अतिशय महत्त्वाच्या असलेल्या आणि नफ्यातील मार्गांवर किमान नव्या गाड्या सोडाव्यात, अशी मागणी असताना नव्या आलेल्या गाड्यांच्या वाटपात मोठ्या प्रमाणात असमतोल झाल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या कामगार संघटनांचे म्हणणे आहे. विशेषतः सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी आपल्या आगाराकडे चांगल्या गाड्या ओढून नेल्या असताना लांब पडल्याच्या जास्त गाड्या चालवणाऱ्या आगारांना मात्र अजूनही जुन्या नादुरुस्त आणि खिळखिळ्या झालेल्या गाड्यांचा वापर करावा लागतो.
’एसटी महामंडळाने किमान लांबपल्ल्याच्या गाड्या तरी व्यवस्थित आणि चांगल्या सोडाव्यात, अशी माफक अपेक्षा आहे. बोईसर-नृसिंहवाडी गाडीत वारंवार बिघाड होत असल्याचा माझा अनुभव आहे.
-दत्तात्रय पाटील, सामाजिक कार्यकर्ते
‘पालघर आगारात मी आठ दिवसांपूर्वीच हजर झालो आहे. बोईसर नृसिंहवारी गाडी ही स्लीपर गाडी असल्यामुळे तिचे सुट्टे भाग आपल्याकडे मिळत नाहीत. गाडीत आज सायंकाळी बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी पुढे प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, म्हणून गाडीची दुरुस्ती करून दिली. त्यामुळे गाडी सुटण्यास वेळ झाला.
-सुजीत घोरपडे, आगार व्यवस्थापक, पालघर