पालघर-योगेश चांदेकर
विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधांचा निर्माता
शिक्षक आणि विद्यार्थी घडवणारा संस्थाचालक
पालघरः वर्गात चार भिंतीच्या आत आणि शाळेच्या वेळेत केवळ पुस्तक घेऊन ज्ञानदान करणं म्हणजे शिक्षण नव्हे आणि असं काम करणारा शिक्षकही नव्हे, तर शिक्षणाची व्याख्या फार विस्तृत आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी, ‘विद्यार्थ्यांच्या मनात केवळ वस्तुस्थिती सांगतो, तो शिक्षक नसतो, तर खरा शिक्षक तो असतो, जो त्यांना उद्याच्या आव्हानांसाठी सज्ज करतो,’ असं म्हटलं होतं. डॉ. राधाकृष्णन यांच्या या व्याख्येत सामावणारे शिक्षक फारच कमी असतात. अशा कमी शिक्षकांत भीमराव दत्तात्रय बोकंद यांचा समावेश होतो.
आज देशात ९७ लाख शिक्षक असले. तरी काही शिक्षकांच्या पदरीच सन्मान येतो. त्याचं कारण ते इतरांपेक्षा आपल्या वेगळ्या कामाचा ठसा विद्यार्थी आणि समाजावर उमटवत असतात. अशा काही मोजक्या शिक्षकांत बोकंद सर यांचाही समावेश होतो. चांगला शिक्षक तोच असतो, ज्याला आपल्यातला विद्यार्थी सतत जागा ठेवतो, असं म्हणतात. बोकंद सर त्यापैकीच एक आहेत.
ऋणानुबंध जपणारा ज्ञानकर्मी
शिक्षकाला वयाचं कधीच बंधन नसतं तसंच तो कायम विद्यार्थी असतो आणि विद्यार्थी म्हणून शिकत असताना तो इतरांना आपलं ज्ञान वाटत असतो. तो केवळ शिक्षण देत नाही, ज्ञान देत नाही तर जगण्याची कला शिकवतो आणि स्वप्न जपण्याची सवयही निर्माण करतो, अशा एका आगळ्यावेगळ्या शिक्षकात बोकंद सर यांचा समावेश होतो. शिक्षक हे त्यांचं कार्य केवळ व्यवसाय मानत नाहीत, तर शिकवणं ही मानवी भावना पवित्र आणि नैतिक कर्तव्य असतं. आपल्याकडं शिक्षक आणि मुलांमध्ये व्यावसायिक संबंध नसतो, तर एक कौटुंबिक जिव्हाळा असतो आणि हे नातं, ऋणानुबंध आयुष्यभर जपायचा असतो, ही शिकवण बोकंद सर स्वतः जगतात आणि इतरांनाही जगायला भाग पाडतात.
प्रतिकूल परिस्थितीवर मात
रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. नरेंद्र जाधव यांच्या ‘आमचा बाप आणि आम्ही’ या पुस्तकात पहिलंच वाक्य असं आहे, की मी आता कुठं आलो कुठपर्यंत पोहोचलो, यापेक्षा मी कुठून आलो याला जास्त महत्त्व असतं. बोकंद सरांचंही तेच आहे. नगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या वरशिंगे या गावात त्यांचा जन्म झाला. तिथंच चौथीपर्यंतचे धडे गिरवले. त्यासाठी दररोज घाट उतरून तीन किलोमीटरची पायपीट करावी लागायची. माध्यमिक शाळा तर १८ किलोमीटर परिसरात नव्हतीच. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. बाहेरगावी राहिले; पण ध्येय सोडलं नाही.
आदिवासी भागाला मानली कर्मभूमी
ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात नोकरी करण्याचा निर्णय बोकंद सरांनी घेतला. शारीरिक शिक्षक तसंच हिंदी विषयाचे शिक्षक असल्यानं मुलांचं शरीर आणि मन घडवण्याचं काम त्यांनी केलं. मुलांच्या अंगी असलेल्या गुणांचा व क्षमतेचा अभ्यास करून त्यांना त्यांच्या त्यांच्या गुणवत्तेनुसार वेगवेगळ्या क्षेत्रात कसं पाठवता येईल, हे त्यांनी पाहिलं. ज्या शाळेत शिकवत होते, त्या शाळेचा कबड्डी संघ सलग तीन वर्ष जिल्हा विजेता राहिला. त्यातील काही खेळाडू राज्य पातळीवर खेळले. त्यांच्या या कार्याची दखल ठाणे जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आणि स्वतः शाळेत येऊन त्यांचा सत्कार केला. दहावीच्या परीक्षेतील त्यांच्या हिंदी विषयाचा निकाल सातत्यानं शंभर टक्के राहिला, यावरून त्यांनी आपल्या विषयाची विद्यार्थ्यांमध्ये किती गोडी निर्माण केली होती हे लक्षात येतं.
पायाभूत प्रकल्पांसाठी मिळवली मदत
आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना बसायला जागा कमी पडते. वर्ग खोल्या पुऱ्या पुरेशा नाहीत. शिक्षण संस्थेच्या मर्यादा ही त्यांच्या लक्षात येत होत्या. संस्थेकडं निधी नाही, म्हणून गप्प बसणाऱ्यातले ते नव्हते. मुख्याध्यापक आणि संस्थाचालकाशी चर्चा करून त्यातून काही मार्ग काढता येतो का? याचा विचार त्यांनी केला. ‘गरज ही शोधाची जननी आहे’ असं म्हणतात. त्याचा प्रत्यय बोकंद सरांच्या प्रयत्नातून दिसतो. त्यांनी दानशूर व्यक्ती संस्थांचा शोध घेतला. त्याची माहिती मिळवली आणि त्यांच्याशी संपर्क साधला. मुंबईच्या ‘स्वजन फाउंडेशन’च्या महेंद्रभाई दोशी यांच्याशी त्यांचा संपर्क आला. बोकंद सरांची तळमळ पाहून त्यांनी या संस्थेला मदत करायचं ठरवलं आणि १९८५ ते १९९५ अशी सलग दहा वर्षे वाडा तालुक्यात त्यांनी चार ठिकाणी इमारत प्रकल्प राबवले.
सामाजिक दायित्वातून २८ खोल्या
जव्हार तालुक्यात अलोंडे येथे दहा खोल्या, तर मलवाडा येथे आणखी दहा खोल्या, खरे आंबिवली येथे एक खोली, तर कमाई आश्रम शाळेत सात खोल्या बांधण्यात बोकंद सरांना यश आलं. त्याचबरोबर आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत २५ वर्षे गरीब विद्यार्थ्यांना रेनकोट, स्वेटर्स, ब्लँकेट आदींची मदत केली आणि गरीब पालकांच्या आरोग्याबाबत माहिती घेऊन काहींची मोफत ऑपरेशनं करून दिली. हे सर्व कार्य स्वजन उत्कर्ष केंद्र वाडा आणि जव्हार यांच्यामार्फत ते करत होते. त्यांच्या या कार्याची दखल न घेतली तरच नवल. ठाणे जिल्हा परिषदेनं त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवलं तसंच मुंबईच्या ‘सजन फाउंडेशन’ नं त्यांना ‘बेस्ट डिव्होटेड टीचर’ हा पुरस्कार दिला.
शिक्षक ते संस्थाचालक
सेवा निवृत्तीनंतरही बोकंद सर स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी प्रामाणिक, एकनिष्ठ, सेवाभावी व्यक्तीच्या सहकार्यांनं स्वतःची ज्ञानप्रकाश शिक्षण संस्था वाडा येथे स्थापन केली. या संस्थेच्या अनेक ठिकाणी माध्यमिक व प्राथमिक शाळा आहेत. दानशूरांच्या मदतीनं त्यांनी या शाळांच्या भव्य इमारती उभ्या केल्या. त्यात सर्व सुख, सुविधा उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न केले. आज त्यांच्या संस्थेत सुमारे ५० कर्मचारी असून त्यांचं शैक्षणिक कार्य ठाणे- पालघर जिल्ह्यात सुरू आहे. त्यांच्या शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना पैशासाठी, अनुदानासाठी अडवलं जात नाही, तर उलट अडचणीतून मात करायला शिकवलं जातं.
लेखनाचीही गोडी
बोकंद सर लेखक असून त्यांची दहा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यात एक पुस्तक तर शिर्डीच्या साईबाबांवर असून त्याचं प्रकाशनंही तिथंच झाला आहे. वाडा आणि विक्रमगड येथील १४ शाळांना बोकंद सरांनी मदत केली आहे. ८१ वर्षाचे असूनही त्यांचं काम अजूनही सुरूच आहे. त्यांच्या या कार्याची वेगवेगळ्या संस्थांनी दखल घेतली आहे. त्यांना ‘ग्रेट इंडियन पार्लमेंटरी अवार्ड’ देऊन गौरवण्यात आलं आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संघटनेकडूनही त्यांचा सामाजिक कार्याबद्दल गौरव झाला आहे.