पालघर-योगेश चांदेकर
गैरकारभाराला संरक्षण असल्याची शंका…
पालघरः डहाणू तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीच्या कारभाराचा पर्दाफाश ‘लक्षवेधी’ने केला आहे. पंचायत समितीने याबाबत चौकशी करून अहवाल जिल्हा परिषदेला पाठवला; परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यापासून जिल्हा परिषदेने या अहवालावर कोणतीही कारवाई केली नाही. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गतिमान प्रशासनाच्या सूचना देत असताना जिल्हा परिषदेचा कारभार मात्र अतिशय संथ गतीने चालू असल्याची टीका होत आहे.
ग्रामपंचायतच्या गैरकारभारावर पांघरून घालण्याचे काम जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग करीत तर नाही, ना असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. डहाणू तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनेक गैरप्रकार आढळले आहेत. ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी केली. सात सदस्यांनी तक्रार केल्यानंतर या तपासणीचा निर्णय घेण्यात आला होता. तपासणी ग्रामसभा तसेच मासिक बैठकीतील इतिवृत्त वेळेवर न लिहिता मनाला येईल त्या वेळी काहीही लिहिता यावे, म्हणून ती कोरी सोडण्यात आली.
निविदासाठी अवघी चार दिवसांची मुदत
ग्रामपंचायतीची कामे देताना त्यांच्या निविदा काढणे आवश्यक होते. त्यासाठी जाहिरात देण्यात आली. निविदा मागवण्यासाठी किमान सात दिवसांचा अवधी देणे आवश्यक असताना फारशा कोणाला माहित नसलेल्या वृत्तपत्रात जाहिरात देऊन त्यासाठी अवघा चार दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. हे सर्व नियमबाह्य असल्याचे लक्षात आल्यावर पंचायत समितीच्या चौकशी अहवालात त्यावर ठपका ठेवण्यात आला होता.
निविदातील अटी, शर्तीचा भंग
बोर्डी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामपंचायतच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यात आपले आक्षेप नोंदवले होते. पंधरावा वित्त आयोग, नागरी सुविधा, जन सुविधा आदी कामे ग्रामपंचायतीत कशी केली जातात, याचा तपशील देण्यात आला होता. या कामाबाबत ग्रामपंचायत अधिकारी समिधा पाटील कोणालाही विश्वासात घेत नाहीत. ग्रामसभा किंवा मासिक सभेत कोणतीही चर्चा केली जात नाही, अशी तक्रार दिनेश ठाकूर यांच्यासह अन्य सात सदस्यांनी केल्या होत्या. शासकीय नियमानुसार निविदा न मागवता किंवा निविदा प्रक्रिया पूर्ण न करता कामे करण्यावर सरपंचांनी व ग्रामपंचायत अधिकाऱ्याने कसा भर दिला, निविदातील अटी, शर्तीचा कसा भंग करण्यात आला आणि त्यात आर्थिक गैरव्यवहार झाला हे या सदस्यांनी निदर्शनास आणले होते. त्यानुसार झालेल्या चौकशीत ठपका ठेवण्यात आला.
खातेनिहाय चौकशीचे काय झाले?
सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी मनमानी कारभार करतात. सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, असा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केलेल्या पत्रात होता. १५ मार्च २०२४ आणि २६ एप्रिल २०२४ रोजी याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप जाधव यांनी चौकशी अहवाल सादर केला. या चौकशी अहवालानंतर वर्षभरात त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. भानुदास पालवे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खातेनिहाय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक होते; परंतु पालवे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या आदेशाला जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने केराची टोपली दाखवली, की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
संथ कारभाराने चराऊ कुरण मोकळे
जिल्हा परिषदेचे नव्याने आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे हे अतिशय कडक आणि चुकांना पाठीशी न घालणारे आहेत; परंतु त्यांच्या काळातही जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग अजूनही जुनीच मानसिकता कायम ठेवून आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी यापूर्वी खातेनिहाय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू, असे सांगितले होते. त्यालाही आता दोन ते तीन महिने झाले आहेत, तरी अद्याप जिल्हा परिषदेचे कारवाईचे गौडबंगाल काय आहे, हे समजायला मार्ग नाही. जिल्हा परिषदेचा असा कारभार ग्रामपंचायतच्या अधिकारी आणि सरपंचांना चरायला मोकळे रान उपलब्ध करून देतो, का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून अनेक ग्रामपंचायतीतील गैरकारभार अशा संथ गतीच्या जिल्हा परिषदेच्या कारभारामुळे कसा उघडकीस येणार आणि संबंधितांना कारवाईचा चाप कसा बसणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोट
‘बोर्डी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गेल्या वर्षभरापासून आम्ही आवाज उठवत असतानाही त्याबाबत जिल्हा परिषदेचे प्रशासन अतिशय संथ गतीने कारभार करते आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम जिल्हा परिषद प्रशासन करत आहे पंचायत समितीची चौकशी झाली परंतु जिल्हा परिषद कडून दोनवेळा कमिटी येऊन चौकशी करण्यात आली पण काहीही कार्यवाही केली नाही.याप्रकरणी आता वरिष्ठांकडे दाद मागावी लागेल.
दिनेश ठाकूर, सदस्य, ग्रामपंचायत बोर्डी