पालघर-योगेश चांदेकर
पालघरः डहाणू तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीत अनेक प्रकारची अनियमितता आढळली आहे. याबाबत ‘लक्षवेधी’ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. सात दिवसांत या प्रकरणी संबंधिताचे म्हणणे मागवून त्या अहवालाच्या आधारे खातेनिहाय चौकशी करायची, की अन्य कारवाई करायची याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
डहाणू तालुक्यातील बोर्डी ही मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या अनेक सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीच्या अनियमित कारभाराच्या चौकशीची मागणी केली होती. सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. निविदा वृत पत्रकांत प्रसिद्धी करते वेळी अटी नियमाचे पायमल्ली करून, नियमब्राहय पद्धतीने केले जाते,त्यामुळे कामाच्या निविदा भरताना नियमावली धाब्यावर बसवतात, अशा स्वरूपाच्या या तक्रारी होत्या.
सोईच्या इतिवृत्तासाठी पाने कोरी
ग्रामसभा तसेच मासिक बैठकीचे इतिवृत्त वेळेवर लिहिले जात नव्हते. मनाला येईल, त्या वेळी ते लिहिले जायचे. काही पाने कोरी सोडून नंतर त्यात मजकूर लिहिला जायचा. ग्रामपंचायत सदस्यांनी हा गंभीर प्रकार गटविकास अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणला. त्यानंतर झालेल्या चौकशीतही इतिवृत्ताची पाने कोरी असल्याचे निष्पन्न झाले होते. विस्तार अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल दिल्यानंतरही कोणतीच कारवाई झाली नव्हती. ‘लक्षवेधी’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले.
कारवाई टाळल्याने आश्चर्य
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे हे अतिशय कडक व चुकांना पाठीशी न घालणारे आहेत; परंतु ग्रामपंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र तसे नव्हते. पंचायत समिती स्तरावरून आलेल्या अहवालावरही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. यावर ‘लक्षवेधी’ने प्रकाश टाकला. ग्रामपंचायत विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे पालघर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीत कामे देताना नियम धाब्यावर बसवले जातात. निविदा नावालाच प्रसिद्ध केल्या जातात. निविदा मागवल्यानंतर पुरेशी वेळ दिली जात नाही आणि इतिवृत्ताची पाने कोरी ठेवली जातात व पाहिजे तेव्हा त्यात मजकूर घालून त्याची पूर्तता केली जाते. अशा स्वरूपाचे गंभीर प्रकार अनेक ग्रामपंचायतीत सुरू आहेत. ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रारी करूनही त्याची दखल दखल घेतली जात नव्हती.
त्रिकुटाचा कारभार, घेईना विश्वासात
आता लोकनियुक्त सरपंच असल्यामुळे त्यांना सदस्य सांभाळण्याची तितकीशी गरज भासत नाही. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे त्रिकूट मनमानी कारभार करते. नेमक्या याच प्रश्नावर बोर्डी ग्रामपंचायत सदस्य दिनेश ठाकूर व अन्य सदस्यांनी बोट ठेवले होते. शासकीय नियमांची पूर्तता न करता निविदा मागवल्या जायच्या, निविदा प्रक्रिया पूर्ण न करता कामे दिली जायची आणि कामाची पूर्तता न होताच किंवा पूर्णत्वाचे दाखले न देताच संबंधितांना पैसे दिले जायचे. असे अनेक गंभीर प्रकार वेगवेगळ्या ग्रामपंचायतीत होत आहेत. कासा, बोर्डी ही त्याची काही उदाहरणे आहेत.
कारवाईचा निर्णय
निविदातील अटी व शर्तीचा भंग करून आर्थिक गैरव्यवहार केला जात असतो. ग्रामविकास अधिकाऱ्यांना आणि ग्रामपंचायत सदस्यांना अंधारात ठेवून मनमानी कारभार केला जातो. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीची चौकशी होण्याअगोदरच त्याची माहिती बाहेर फुटते. असे गंभीर प्रकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले होते. या प्रकरणी आता जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधितांना कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोट
‘बोर्डी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता आढळली आहे. निविदा भरताना त्यात त्रुटी ठेवण्यात आल्या तसेच इतिवृत्ताची पाने कोरी ठेवण्यात आली. याप्रकरणी चौकशीत आणि त्रुटी आढळल्याने ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच व अन्य संबंधितांना नोटिसा पाठवून त्यांचे म्हणणे मागवले आहे. त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर संबंधितांवर काय कारवाई करायची याचा निर्णय घेतला जाईल.
चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर