पालघर-योगेश चांदेकर
पालघर आणि रायगड जिल्ह्यात दोन आश्रमशाळा सुरू होणार
पालघरः राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष तसेच श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखरे यश आले आहे. बंद पडलेल्या पाच आदिवासी आश्रमशाळांपैकी दोन आदिवासी आश्रमशाळा सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
पुरेसे विद्यार्थी नसल्याने आदिवासी भागातील पाच शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यात पालघर जिल्ह्यातील तीन व रायगड जिल्ह्यातील दोन शाळांचा समावेश होता. या शाळा बंद केल्यानंतर तिथल्या शिक्षकांचे अन्यत्र समायोजन करण्यात आले; परंतु विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती.
वारंवार पाठपुरावा
कातकरी समाजासाठी कायम कार्यरत राहणाऱ्या पंडित यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे दिलेल्या पत्रात बंद झालेल्या पाच शाळा पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. त्यावर २७ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन शाळा पुन्हा सुरू करण्यास तत्त्वतः मान्यता दिली होती. पंडित यांनी जानेवारीत पुन्हा मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी यांना याबाबत स्मरण पत्र दिले. त्यानंतर राज्य सरकारने आता शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारचा आदेश
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने डहाणू (पालघर) आणि पेण (रायगड) प्रकल्पातील बंद करण्यात आलेल्या दोन शासकीय प्राथमिक आश्रमशाळा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात शासन निर्णय १८ जून रोजी काढण्यात आला आहे. यात खर्डी (ता. वसई, जि. पालघर) व कळंब (ता. कर्जत, जि. रायगड) या दोन ठिकाणच्या शाळांचा समावेश असून, या शाळांमध्ये पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग या वर्षीपासून सुरू करण्यात येणार आहेत.
पुढच्या वर्षापासून आणखी वर्ग
१८ जूनच्या या निर्णयानुसार, कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश दिला जाणार असून, रिक्त जागांवर अनुसूचित जमातीतील इतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची तात्पुरती व्यवस्था प्रतिनियुक्ती / समायोजनाने केली जाणार आहे. तसेच इमारतीसाठी शासकीय जागा वापरण्याचे आणि गरज असल्यास भाडेतत्त्वावर जागा घेण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. पुढील शैक्षणिक वर्षांपासून नैसर्गिक वर्गवाढ देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर शिक्षणाची संधी मिळणार आहे. ते त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
कोट
कातकरी समाजासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. अनेक वर्षे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या या समाजासाठी ही पुन्हा सुरू होणारी शाळा आशेचा किरण ठरेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागणीची दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार.
विवेक पंडित, अध्यक्ष, राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समिती