banner 728x90

‘लाडक्या बहिणीं’च्या साक्षीने शपथविधी; आझाद मैदानावर उद्या भव्य सोहळा; शेतकरी, साधुसंतांना निमंत्रण

banner 468x60

Share This:

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’च्या साक्षीने नव्या सरकारचा गुरूवारी शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही ठेवण्यात आली आहे.

banner 325x300

महायुती सरकारचा शपथविधी येत्या ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात पार पडणार आहे. त्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून, त्यावर पहिल्या रांगेत पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची आसन व्यवस्था असेल. तर मागे एका बाजूला मंत्री, तर दुसऱ्या बाजूला काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर समोर सुमारे २५ हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महायुतीला सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांसाठी शपथविधीच्या ठिकाणी ‘लाडकी बहीण कक्ष’ उभारण्यात येणार असून, तेथे १० हजार महिलांची व्यवस्था केली जाणार आहे.

‘एक है तो सेफ है’चे कक्ष

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने ‘एक है तो सेफ है’चा नारा दिला होता. आता शपथविधी सोहळ्यातही ‘एक है तो सेफ है’चा नारा दिसणार असून, त्यासाठी खास कक्ष निर्माण करण्यात आला आहे. याठिकाणी ‘एक है तो सेफ है’, अशा आशयाचे मजकूर असलेले टी-शर्ट परिधान करून महायुतीचे कार्यकर्ते बसणार आहेत. तसेच शेतकरी, संविधान असे आणखी दोन कक्ष निर्माण करण्यात आले आहेत.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था; अधिकाऱ्यांची मोठी फौज

शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदान परिसरात पोलीस अधिकाऱ्यांची मोठी फौज तैनात असणार आहे. याठिकाणी एक सह पोलीस आयुक्त, तीन अपर पोलीस आयुक्त, सहा पोलीस उपायुक्त, १६ सहाय्यक पोलीस उपायुक्त आणि सुमारे ६०० पोलीस अधिकारी हजर असणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पंतप्रधानांसह गृहमंत्री, अन्य केंद्रीय मंत्री निमंत्रित

राज्यातील महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच राज्यातील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना देखील सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच विविध ठिकाणचे धर्मगुरू, साधुसंतही उपस्थित राहणार आहेत. शपथविधीपूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आझाद मैदान परिसरात पाच हजार पोलीस तैनात राहणार

मुंबई :शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मैदान परिसरासह मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात येणार आहे. सुमारे ५ हजार पोलीस आझाद मैदान परिसरात तैनात राहणार असून त्यामध्ये जवळपास चार ते साडेचार हजार पोलीस अंमलदारांचा समावेश असेल. तसेच, २ दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोधक व नाशक पथकेही असणार आहेत.

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानात एकूण तीन व्यासपीठ उभारण्यात येणार आहेत. मुख्य व्यासपीठावर पंतप्रधानांसह मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच इतर दोन व्यासपीठांवर लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर असतील.

सर्व मान्यवरांच्या (व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी) आगमन मार्गांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या मार्गांवर पोलीस अधिकारी, गृहरक्षक दल, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक तैनात असतील. तसेच या मार्गांवर वाहतूक पोलीसही तैनात असणार आहेत. त्यामध्ये सुमारे १४४ वाहतूक पोलीस अधिकारी आणि १ हजार पोलीस अंमलदारांचा समावेश असेल. तसेच, मुंबईतील मुख्य रस्त्यांवर साध्या वेशातील पोलीस अधिकारीही तैनात असतील, अशी माहिती सूत्रांनी व अधिकाऱ्यांनी दिली.

महापालिकाही सज्ज

● आझाद मैदानावर गुरुवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनानेही तयारी केली आहे. आझाद मैदान राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. परंतु पालिकेनेही या शपथविधीसाठी सेवा-सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

● आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या रस्त्यांची डागडुजी, वाहतूक चिन्हे व रेषा यांची रंगरंगोटी, दुभाजकांची रंगरंगोटी, पाणीपुरवठा, शौचालये आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच मैदान परिसरातील झाडांच्या वाढलेल्या फांद्याच्या छाटणीचे काम होती घेण्यात आले आहे.

● मैदानातील कचरा आणि राडारोडा हटवणे, अतिक्रमण निर्मूलन आदी कामांना वेग आला असल्याची माहिती पालिकेच्या ‘अ’ विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली. तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांनुसार या भागात सोयी-सुविधा देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!