महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे. तसेच ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. त्यानुसार राज्य विधिमंडळाच्या मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. यादरम्यान, ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. तसेच, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये शोक प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.
अधिवेशन काळात शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज होणार आहे आणि सोमवार, २ मार्च रोजी होळी आणि ३ मार्च रोजी धूलिवंदन असल्याने कामकाज होणार नाही. १९ मार्चला गुढीपाडव्याची सार्वजनिक सुट्टी असल्याने या दिवशी कामकाज होणार नाही. तसेच 20 मार्च रोजी देखील विधिमंडळ कामकाज होणार नाही.
अधिवेशनामध्ये येणारे महत्त्वाचे विषय!
– संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२६ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. यावर चर्चा केली जाणार
– जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक ९ मार्च रोजी दोन्ही सभागृहात चर्चा होणार
– मराठी भाषा गौरव दिननिमित्त चर्चा होणार
– सभागृहातून निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ आयोजित होणार
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री छगन भुजबळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
















