पालघर-योगेश चांदेकर
अभियंता प्रशांत इंगळेंनी शासनाच्या तिजोरीला लावला सुरुंग
पालघरः पालघर जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रशांत इंगळे यांची केळवा-माहीम पाणीपुरवठा योजनेतील कंट्रोल पॅनल खरेदीतील गैरव्यवहारावरून चौकशी सुरू असतानाच त्यांचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी स्वतःचे वेतन वाढवून घेतले असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून ही रक्कम वसूल करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.
इंगळे यांनी केळवा-माहीम पाणीपुरवठा योजनेच्या कंट्रोल पॅनेलची दुरुस्ती न करता पाच लाख रुपयांचे बील काढले. गेल्या वर्षी दुरुस्तीला पाठवलेले पंप आता आले. पाच लाख रुपयांचे बील काढल्याचे संबंधित ठेकेदारालाही माहीत नाही. इतक्या गंभीर प्रकारानंतर त्यांचे आणखी काही गंभीर प्रकार उघडकीस येत आहेत.
काम बिगर आदिवासी विभागात, वेतन आदिवासी विभागात काम करण्याचे
इंगळे हे ग्रामीण पाणी पुरवठा विभागात अभियंत्यांचे सहाय्यक म्हणून काम करत होते. त्यांची पाणीपुरवठा विभागात पदोन्नती झाली. वसई हा अंशतः आदिवासी भाग आहे. त्यामुळे तेथे आदिवासी विभागाचे वेतन आणि फायदे मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर इंगळे यांचा पगार पंचवीस हजार पाचशे रुपये होता. त्यांची पदोन्नती झाल्यानंतर हा पगार ३८ हजार सहाशे रुपये असायला हवा; परंतु इंगळे प्रत्यक्षात वसईला काम करीत असताना त्यांनी पालघर येथील आदिवासी विभागातील कनिष्ठ अभियंत्याच्या वेतनश्रेणीचा म्हणजे ५६ हजार रुपये दरमहा पगार घेतला. पगाराची ही तफावत दर महिन्याला सुमारे वीस हजार रुपये होते.
रक्कम वसुलीचे आदेश
इंगळे यांची २०२० मध्ये नियुक्ती झाल्यापासून वेतन विभागातील कर्मचारी यांना हाताशी धरून त्यांनी स्वतःचे वेतन वाढवून घेतले असल्याचा गंभीर प्रकार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या निदर्शनास आला आहे. त्यांची नियुक्ती वसईला असताना पालघर येथील आदिवासी विभागातील वेतनश्रेणी ते घेतात, ही तर आणखी एक गांभीर्याची बाब आहे. या प्रकरणात आता वेतन पडताळणी समितीने त्यांना गेल्या साडेचार वर्षातील लाखो रुपयांच्या वेतनाची परतफेड करण्यास सांगितले आहे.
चौकशी अधिकारी ठाकरे यांना मॅनेज करण्याचा प्रयत्न
इंगळे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केलेले एम. ए. ठाकरे या अधिकाऱ्यांवरही दबाव असल्याचे सांगण्यात येते. स्वतः ठाकरे यांनीच खासगीत बोलताना आपल्याला मॅनेज करण्याचा प्रकार घडल्याचे सांगितले? एखादा अधिकारी आपल्याच दुसऱ्या सहकाऱ्यांना कसा मॅनेज करू शकतो आणि कसा दबाव आणू शकतो हे या प्रकारावरून समोर आल्याचे सांगितले जाते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनीच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते दरम्यान ठाकरे यांनी दबावाखाली चुकीचा अहवाल दिल्यास तसेच इंगळे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास काही महत्वाचे पुरावे लक्षवेधीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाकरे काय अहवाल सादर करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकशी अहवाल लवकरच देणार
याबाबतचा अहवाल ठाकरे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करणार असून आता इंगळे यांच्या जादा वेतनाचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर आता इंगळे कुणाकुणाला मॅनेज करणार आणि त्यांचा पाय आणखी किती खोलात जाणार याची चर्चा सुरू झाली असून त्यांच्या यापूर्वीच्या सर्वच कारकीर्दीतील गैरकारभाराचा आता पर्दाफाश होण्याची आवश्यकता असून पालवे यांनी आता या प्रकाराकडे आणखी गांभीर्याने पाहायला हवे, अशी मागणी होत आहे