banner 728x90

मंत्रिमंडळ निर्णय; कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळणार

banner 468x60

Share This:

शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या पिकांचेही राज्याच्या विविध भागांमध्ये नुकत्याच झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या शेतकऱयांनाही भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. शेतकऱयांनी कापणी करून ठेवलेल्या पिकांचेही पावसात नुकसान झाले असल्याचे अनेक मंत्र्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले. पावसामुळे घरांचीही पडझड झाली होती. त्यांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी तातडीने मदत द्यावी अशा सूचना मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभाग अशा सहा विभागांना 49 कोटी रुपये मदत वितरीत करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी द्यावयाची भरपाई आणि निकष पूर्वीप्रमाणेच देण्यात येतील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

banner 325x300

पावसामुळे मच्छीमारांच्या सुक्या मासळीचेही नुकसान झाल्याने त्यांनाही भरपाई देण्यात यावी. पावसामुळे रस्ते आणि छोटय़ा पुलांचे नुकसान झाले आहे, त्यांची दुरुस्ती करण्यात यावी.

ईएसआयसीच्या नऊ रुग्णालयांना शासकीय जमीन देणार

कामगार विमा महामंडळाच्या प्रस्तावित नऊ रुग्णालयांना जमीन देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ईएसआयसीचे 200 खाटांचे रुग्णालय उभारले जाणार असून त्यासाठी करोडी येथील 15 एकर गायरान जमीन देण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक वसाहतींमुळे कामगारांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने तिथे ईएसआयसीचे रुग्णालय असावे अशी मागणी होती. यासह बिबवेवाडी (पुणे), अहिल्यानगर, सांगली, अमरावती, बल्लारपूर (चंद्रपूर), सिन्नर (नाशिक), बारामती (पुणे), सातारा आणि पनवेल (रायगड) येथील प्रस्तावित रुग्णालयांसाठीही जमीन देण्यास मान्यता दिली.

मुंबईतील टोल सवलतीपोटी एमएसआरडीसीला भरपाई

मुंबई शहरात प्रवेश करण्याच्या पाच टोलनाक्यांवर हलकी वाहने, शालेय बसेस व एसटी बसेस यांना टोलमधून सवलत देण्यात आली आहे. या टोलच्या सवलतीपोटी एमएसआरडीसीला भरपाई देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. एमएसआरडीसीच्या मुंबई प्रवेशद्वाराच्या शीव-पनवेल मार्गावर वाशी येथे, लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर मुलुंड येथे, पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड येथे, ऐरोली पुलाजवळ तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर येथील नाक्यांवर 14 ऑक्टोबर 2024 पासून टोलमधून सवलत देण्यात आली आहे. ही सवलत दिल्यामुळे एम.ई.पी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांना या प्रकल्पासाठी करारनाम्यानुसार नुकसानभरपाई देण्याकरिता मुख्य सचिव यांच्या समितीने शिफारस केली आहे. तसेच टोल वसुलीचा कालावधी 17 सप्टेंबर 2029 पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली. मुंबई व उपनगरातील 27 उड्डाणपूल व संबंधित बांधकामांची निगा व देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ही संबंधित कंपनीकडेच राहणार आहे. याशिवाय वाशी खाडी पूल या प्रकल्पासाठी टोल सवलत नुकसानभरपाईपोटी खाडी पूल क्रमांक 3 च्या प्रकल्पाची सुमारे 775 कोटी 58 लाख रुपयांची किंमत महामंडळास टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!