भारतीय कसोटी संघाचा युवा कर्णधार शुभमन गिल यानं इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावलं. इंग्लंडच्या भूमीत सर्वाधिक धावसंख्या करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत गिल यानं स्थान मिळवलं आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया जोशात मैदानात उतरली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला आमंत्रित केलं. भारतीय संघाला गुंडाळून आघाडी घेता येईल असा त्यामागचा उद्देश होता. पण त्याच्या मनसुब्यांवर भारताच्या धुरंधरांनी पाणी फेरलं.
यशस्वी जयस्वालनं संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. सुरुवातीला केएल राहुलच्या रुपानं भारताला पहिला झटका मिळाला. पण त्यातून सावरून यशस्वीनं एका बाजूनं खिंड लढवली. करूण नायरच्या साथीनं त्यानं दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली. पण नायर हा ३१ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या शुभमन गिलने टिच्चून फलंदाजी केली.
शुभमन गिल यानं ३११ चेंडूंचा सामना करता २०० धावा केल्या. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं द्विशतक आहे. गिल यानं कसोटी संघाचं नेतृत्व करतानाही पहिलं द्विशतक झळकावलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही त्यानं दमदार फलंदाजी करत शतकी खेळी केली होती.
दिग्गजांच्या यादीत स्थान
दिग्गजांच्या यादीत स्थान
भारतीय युवा फलंदाज शुभमन गिल यानं या द्विशतकासह महान खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. इंग्लंडमध्ये १९७९ मध्ये ओव्हल कसोटीत सुनील गावसकर यांनी २२१ धावा केल्या होत्या. तर राहुल द्रविड यानं २००२ मध्ये ओव्हलच्या मैदानावरच २१७ धावांची सुरेख खेळी केली होती. शुभमन गिल यानं यावर्षी म्हणजेच २०२५ मध्ये द्विशतक झळकावलं आहे. सचिन तेंडुलकर यानं लीड्समध्ये २००२ मध्ये १९३ धावा केल्या होत्या. तर रवी शास्त्री यांनी १९९० मध्ये ओव्हलच्या मैदानावर १८७ धावांची खेळी केली होती.