banner 728x90

कासा ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर यांचा आणखी एक प्रताप उघड

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर


माजी सरपंचाच्या डीएससी ने केला खर्च
माजी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारीही अडचणीत

banner 325x300

पालघरः डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराची प्रकरणे काही थांबायला तयार नाहीत. विशेष म्हणजे कार्यकाळ संपलेल्या सरपंचांच्या डीएससी द्वारे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून १५ लाख रुपये काढून एका फर्मला देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात आता जिल्हा परिषद कारवाई करण्याची शक्यता आहे.

कासा ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराचे एक एक नमुने ‘लक्षवेधी’ने उघडकीस आणले असून त्याचे पुरावे ही संबंधित अधिकारी यांना सादर केले आहेत. असे असताना आता एक गंभीर प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतच्या सरपंचांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या डीएससी ने कोणतेही आर्थिक व्यवहार करता येत नाहीत. मुदत संपलेल्या दिवशीच त्यांची डिजिटल सिग्नेचर डीॲक्टिव्हेट करावी लागते. तसे पत्र पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना द्यावे लागते आणि पदभार घेतलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावे डिजिटल सिग्नेचर ॲक्टिव्हेट करून घ्यावी लागते. डिजिटल सिग्नेचर डीॲक्टिव्हेट करण्यासाठी साधारण २४ तास लागतात, तसेच नवीन पदभार स्वीकारलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची डिजिटल सिग्नेचर ॲक्टिव्हेट करण्यासाठी सुमारे तीन दिवसांचा कालावधी लागतो.

माजी सरपंचही संशयाच्या भोवऱ्यात?
कासा ग्रामपंचायतमध्ये घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. तत्कालीन सरपंच रघूनाथ गायकवाड यांचा कार्यकाळ १८ जुलै २०२१ रोजी संपला त्यानंतर त्यांची डिजिटल सिग्नेचर डीॲक्टिव्ह करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर व स्वतः रघूनाथ गायकवाड यांची सुद्धा होती; परंतु त्यांनी तसे न करता कार्यकाळ संपलेल्या माजी सरपंच रघुनाथ गायकवाड यांच्या डिजिटल सिग्नेचरचा गैरवापर करून ‘ दुसऱ्याच दिवशी १९ जुलै २०२१ रोजी कल्पवृक्ष ग्रीन अँड सोलर एनर्जी कंपनी’वसईला देण्यासाठी १५ लाख रुपयांची बिले अदा करण्यात आली. वास्तविक ‘कल्पवृक्ष ग्रीन अँड सोलर एनर्जी’ला नवीन प्रशासकीय आधिकारी येईपर्यंत बिले अदा करणे अनियमित आहे. परंतु या सर्व प्रकारामुळे कासा ग्रामपंचायतचा सर्वच कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

सरपंचांचा प्रतिसाद नाही
कार्यकाळ संपलेल्या सरपंचांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून १५ लाख रुपयांची बिले काढण्यात आली. हे करताना तत्कालीन सरपंच रघुनाथ गायकवाड यांची या प्रकरणात संमती होती का?, की त्यांना हा प्रकार माहीत नव्हताच. त्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर हा आता चौकशीचा मुद्दा झाला आहे. या प्रकरणात गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

ठराविक ठेकेदारांनाच कामे
कासा ग्रामपंचायतीत बहुतांशी कामे एकतर वसईच्या बालाजी एंटरप्रायझेस या एका फर्ममार्फत करण्यात आली. खरेदी ही त्यांच्यामार्फत करण्यात आली आणि आता ‘कल्पवृक्ष ग्रीन सोलर एनर्जी’ वसई या संस्थेमार्फत बाकीची कामे करण्यात आली. हा साराच प्रकार संशयास्पद आहे. या प्रकरणाची चौकशी करून पाचलकर यांच्यासह दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असून. कासा ग्रामपंचायतीत पाचलकर ज्या दिवसापासून रुजू झाले, त्या दिवसापासून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता केली जात आहे. दरम्यान पाचलकर यांचा कोव्हीड काळात सॅनिटायझर खरेदीचाही मोठा घोटाळा समोर आला होता परंतू त्या चौकशीत त्यांना अभय मिळाल्याने त्यांनी असे भ्रष्टाचार केल्याने त्यांचा बचाव होतो याची जाण होती त्यामुळेच असे प्रकार घडले की काय असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे.


ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा कार्यकाळ संपल्यानंतर विस्तार अधिकारी म्हणून मला पदभार देण्यात आला होता परंतु मी पदभार हा १९ तारखेनंतर स्वीकारला आहे. तसेच माजी सरपंच यांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांच्या डिजिटल सिग्नेचरचा वापर करून पैसे काढणे अयोग्य आहे.
संदीप जाधव, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, डहाणू






‘कार्यकाळ संपलेल्या सरपंचांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून पैसे काढणे हे गैर आहे. या प्रकरणी आम्ही कारवाई करू.चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!