पालघर-योगेश चांदेकर
पालघरः डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीने १२ लाख ८० हजार रुपयांचे आगाऊ पेमेंट काढले. प्रत्यक्षात शाळा व समाज मंदिराचे रंगकाम झाले नसताना ही बिले अदा केल्यामुळे संशय निर्माण झाला आहे. ‘लक्षवेधी’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करताच पंचायत समितीने चौकशी सुरू केली आहे. कामे न करताच आगाऊ बिले देण्यात आली असून, ग्रामपंचायत अधिकाऱ्याने अधिकार नसताना एवढी रक्कम काढल्याने आता त्यांच्यासह सरपंचावरही कारवाईची टांगती तलवार आहे.
डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतच्या कारभाराबाबत यापूर्वीही काही तक्रारी आल्या होत्या. ग्रामपंचायत सदस्यांनीच कासा ग्रामपंचायतीच्या कारभारातील अनियमितता लक्षात आणून दिली आहे. मासिक बैठकीत तसेच ग्रामसभेत गावासाठी एलईडी आणि कचराकुंड्या खरेदी करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार वसईच्या बालाजी एंटरप्राइजेस या फर्मला हे काम देण्यात आले; परंतु कामे अपूर्ण असताना आगाऊ रक्कम देण्याचा निर्णय मासिक सभेत झाला नव्हता.
रंगकामाचा ठेका संशयास्पद
कासा ग्रामपंचायतीने दिलेल्या ऑर्डरप्रमाणे बालाजी एंटरप्राजेसने ५२ कचराकुंड्या या ग्रामपंचायतीला पुरवल्या आहेत. या सोबतच एलईडी बल्बही पुरवले आहेत; परंतु सामान पुरवणाराच रंगकाम कसे करू शकतो, असा प्रश्न आहे. पेंटर आणि पुरवठादार तरी वेगवेगळे असायला हवेत; परंतु कासा ग्रामपंचायतीच्या एकूण कारभाराबाबतच संशय घ्यायला जागा आहे. ग्रामपंचायती हद्दीतील समाज मंदिर आणि शाळांच्या रंगरंगोटीचे काम होण्याअगोदरच बालाजी इंटरप्रायजेसला संपूर्ण पैसे देण्यात आले. शाळेच्या रंगोटीच्या गुणवत्तेचा मुद्दा काही सदस्यांनी उपस्थित करून हे काम बंद पाडले, तरीही ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर यांनी या संस्थेला संपूर्ण कामाचे पैसे दिल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या चौकशीतच ॲडव्हान्स बिले दिल्याचा तपशील उपलब्ध झाला आहे.
सरपंचही अडकणार
सरपंच सुनीता कामडी यांनी जरी ग्रामपंचायत अधिकारी पाचलकर यांच्यावर चुकीचे काम केल्याचा आरोप केला असला, तरी चौकशीत त्यांच्यावरही ठपका आहे. मला विश्वासात न घेताच पैसे काढले अशी सारवासारव त्यांनी सुरू केली आहे. ठेकेदाला देण्यासाठी हे पैसे काढण्यात आले याची मला माहिती नव्हती. असे त्या सांगत असल्या, तरी ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी संयुक्त असते. त्यामुळे त्यांचेही म्हणणे मागवण्यात आले आहे.
कागदपत्रे मागवली
कासा ग्रामपंचायतीच्या आर्थिक अनियमितेची प्राथमिक चौकशी केली, तेव्हा त्यात वस्तुस्थिती आढळली. कामे न करताच पैसे देण्यात आले. या प्रकरणी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर पंचायत समिती स्वयंस्पष्ट अहवाल जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवणार आहेत.
दरम्यान आता या प्रकरणी काय कार्यवाही होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोट
‘कासा ग्रामपंचायती संदर्भात आलेल्या तक्रारीनुसार चौकशी केली आहे. प्राथमिक चौकशीत काम न करताच आगाऊ रक्कम दिल्याचे आढळले आहे. ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांची संयुक्त जबाबदारी असून त्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेला पाठवण्यात येईल. काय कारवाई करायची, याचा निर्णय जिल्हा परिषद घेईल.
पल्लवी सस्ते, गटविकास अधिकारी, डहाणू