Budget 2025 Announcement : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या तिसऱ्या टर्मचा आज पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. यांमध्ये अर्थमंत्री सीतारामन यांनी बारा लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच शेतकरी, महिला आणि आरोग्यासाठी देखील मोठ्या घोषणा केल्या आहेत.
याशिवाय उत्पन्नदरानुसार नवी कर प्रणाली कशी असेल याची माहितीही अर्थमंत्र्यांनी दिली आहे. आजच्या अर्थसंकल्पात शेती, आरोग्य, रोजगार, लघू आणि मध्यम उद्योग, निर्यात, गुंतवणूक, ऊर्जा, नागरिकरण, खाणकाम, अर्थ, कर या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं? जाणून घेऊ सविस्तर….
आजच्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे आभार व्यक्त केले. तसेच देशात तयार होणारे कपडे, चामड्याच्या वस्तू, मत्स्योत्पदनांवरील शुल्क कमी झाल्याने महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यानी व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र हे शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. सरकारी शाळांमध्ये पाच लाख अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणे, शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवणे, भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध करुन देणे, आयआयटीमधील तसेच मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थीसंख्या आणि सुविधा वाढवण्याचा फायदा राज्यातील युवकांना निश्चितपणे होईल, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
याबाबत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, अर्थसंकल्पाचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होणार आहे. बजेटमधून बिनव्याजी कर्ज पायाभूत सुविधांसाठी राज्याला मिळणार आहे. तसेच राज्यातील एमएसएमई आणि स्टार्टअप क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्र राज्यात ५५ हजार हेक्टरवर कापसाची लागवड होते. त्यामुळे कापसाच्या नवीन मिशनचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भरीव तरतूद?
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एमयुटीपी-३ प्रकल्पासाठी 1465 कोटी 33 लाख रुपयांचा निधी
पुणे मेट्रोसाठी 837 कोटींची तरतूद
मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत 230 कोटी रुपयांचा निधी मिळणार?
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी 4 हजार 3 कोटी
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे – प्रशिक्षण संस्थेसाठी 126 कोटी 60 लाख रुपयांचा निधी
मुंबई मेट्रोसाठी 1673 कोटी 41 लाख
महाराष्ट्र ग्रामीण दळणवळन सुधारणांसाठी 683 कोटी 51 लाख मिळाले
महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी 596 कोटी 57 लाख
ऊर्जा संवर्धन व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी 186 कोटी 44 लाख
महाराष्ट्र रुरल कनेक्टिव्हीटी इम्प्रुव्हमेंट प्रकल्पासाठी 683 कोटी
महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस प्रकल्पासाठी 100 कोटी
इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 1094 कोटी
उपसा सिंचन योजनांसाठी 186 कोटी