पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभागाच्या आगामी १०० दिवसांत राबविण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेताना त्यांनी ही घोषणा केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “नाशिक येथील राम-काल पथ विकास आणि सिंधुदुर्गातील सागरी पर्यटन प्रकल्प वॉर रूमशी जोडले जातील. राज्य लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत पर्यटन विभागाच्या १४ सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध होतील.” पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक येथील राम-काल पथ विकास, सिंधुदुर्गातील पाण्याखालील सागरी पर्यटन, पुरंदर शिवसृष्टी थीम पार्क, अजिंठा-वेरूळ पर्यटन विकास, आणि स्वदेश दर्शन अंतर्गत अहमदनगर किल्ला पर्यटन उपक्रमांना गती देण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्र पर्यटन विभाग विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय महोत्सवांमध्ये सहभागी होणार आहे. माद्रिदमधील ‘फितूर आंतरराष्ट्रीय ट्रेड फेअर’, नाशिक ग्लॅम्पिंग फेस्टिवल, पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव’, आणि महाबळेश्वर येथे होणाऱ्या ‘टुरिझम कॉन्क्लेव’साठी विशेष आयोजन केले जाईल.
पर्यटन विभागाने ३१ मार्चपूर्वी उद्योग प्रमाणपत्र, साहसी पर्यटन नोंदणी, होम स्टे नोंदणी यांसह ८ नवीन सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पर्यटन विकासासाठी गतीमान कृतीचे महत्त्व सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राचे पर्यटन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास मदत होणार आहे.