मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे गतीने करून दिलेल्या मुदतीत ही विमानतळे कार्यान्वीत व्हावीत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सर्व विमानतळांच्या बांधकाम प्रगतीच्या आढावा बैठकीत दिले.
यावेळी त्यांनी प्रस्तावित पालघर विमानतळ उभारणीसाठी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही बैठकीवेळी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यातील सर्व विमानतळांच्या बांधकाम प्रगतीच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सहसचिव रुबिना अली, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी उपस्थित होते. यावेळी आशियातील सर्वात मोठी फ्लाईंग अकॅडमी एअर इंडिया अमरावतीत सुरु करण्यासंबंधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विमानतळांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे अतिशय गरजेचे आहे. देश ५ ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमीकडे वाटचाल करत असताना, सर्वात वेगाने वाढणारे विमान वाहतूक क्षेत्र फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे. त्यामुळे नागरी विमान क्षेत्राचा वाढता विस्तार विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
यावेळी नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यकारी अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री सचिवालय तसेच विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव उपस्थित होते.
बैठकीदरम्यान झालेले महत्वाचे निर्णय
✅सोलापूर आणि कोल्हापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची व्यवस्था करणे
✅शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग व्यवस्था तातडीने सुरु करणे
✅नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे प्रलंबित प्रश्न ३१ मार्चपर्यंत सोडवण्याचे निर्देश
✅जळगाव विमानतळ येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करा
✅पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करण्याचे आदेश
✅पालघर विमानतळ उभारणीसाठी प्रक्रिया सुरू करा
✅वाढवण येथील प्रस्तावित नवीन विमानतळाबाबत तात्काळ निर्णय घ्या