मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली सही मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश फाईलवर सही करून दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य करण्याची विनंती केली होती.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
भव्य-दिव्य शपथविधी सोहळा
आज राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा भव्य-दिव्य शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. याशिवाय शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी या तिघांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुंबईतील आझाद मैदानावर हा भव्य-दिव्य सोहळा पार पडला.