पालघर-योगेश चांदेकर
जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मोहन पाचलकरला आशीर्वाद?
मोहन पाचलकरला अभय कुणाचे?
पालघरः डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतचे अधिकारी मोहन पाचलकर यांच्या गैरकारभारविषयी जिल्हा परिषदेला अहवाल पाठवून महिना उलटून गेला असून तरीही जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मात्र त्यावर कारवाई करण्यासाठी मुहूर्त मिळत नाही. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांचेच पाचलकरला आशीर्वाद आहेत का, असा प्रश्न आता सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत.
गेल्या पाच-सहा वर्षांपासून पाचलकर डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीत काम करत आहेत. कामे न करताच संबंधित एजन्सींना बिले देणे, काम पूर्णत्वाचे दाखले न घेता पैसे अदा करणे, दोन ठिकाणी रंगकाम झाले नसताना अनेक ठिकाणी रंगकाम झाल्याचे दाखवून पैसे काढणे, जिओ टॅगिंग न करता फोटो काढणे, एकाच कामाचे फोटो वेगगेवळ्या ठिकाणी लावून वेगवेगळ्या ठिकाणची बिले काढणे, ग्रामपंचायतच्या आराखड्यात नसलेली कामे हाती घेऊन त्यातून पैसे उकळणे, ठराविक एजन्सीला काम देणे असे गैरप्रकार पाचलकर यांनी केले आहेत.
चौकशीत ठपका, तरी कारवाईला दिरंगाई
कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची डिजिटल स्वाक्षरी वापरून संबंधितांना लाखो रुपये अदा करण्यात आले. याप्रकरणी ‘लक्षवेधी’ने आवाज उठवला. त्यानंतर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते आणि विस्तार अधिकारी संदीप जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यात ग्रामपंचायतच्या संगणक ऑपरेटरवर तातडीने कारवाई करण्यात आली; मात्र तत्कालीन सरपंच व कार्यरत सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर दोषारोप ठेवूनही त्यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
निधीला कसे फुटतात पाय?
जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग हा अतिशय महत्त्वाचा असतो. वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळत असतो. या निधीचा योग्य विनयोग होतो, की नाही की, त्याला कोठे पाय फुटतात हे तपासण्याची जबाबदारी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती ग्रामपंचायत विभागाची असते; परंतु जिल्हा परिषद व पंचायत समिती ग्रामपंचायत विभाग अशा किती पाचलकरांना पाठीशी घालतो, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर दडपण कोणाचे?
पाचलकर यांच्या गैरकारभाराचे एक एक नमुने उघडकीस येत असून संघटनेच्या जीवावर एकाच ठिकाणी थांबून गैरकारभार करत असल्याचे निष्पन्न होऊनही त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग दाखवीत नाही. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पाचलकरसारख्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अभय आहे का, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग पाठीशी घालत असेल, तर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांच्या विरोधात थेट आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
आनंदभाई ठाकूर यांची तक्रार
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार आनंदभाई ठाकूर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाचलकर यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढच्या महिन्यात होणार असून पाचलकरसारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना बदली करण्याचे दाखवून त्यांच्या गैरकारभारावर पांघरून घालण्याचे उद्दिष्ट तर नाहीना असा प्रश्न आता सामाजिक कार्यकर्त्यांना पडला आहे.
योजना खिसे भरण्यासाठी
जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर तसेच तत्कालीन सरपंच व कार्यरत सरपंच यांनी कासा ग्रामपंचायतीत उघडउघड गैरव्यवहार केला असून या गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणे आवश्यक असताना जगताप यांनी मात्र अद्याप कोणतीही कारवाई का केली नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतीत पाचलकर होऊ द्यायचे का, एका ठिकाणी पाठीशी घातल जात असेल, तर दुसऱ्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्याचे गैरव्यवहार करण्याचे धाडस वाढते आणि कोणतीच कारवाई होत नसल्याने गैरकारभाराला उत्तेजन दिल्यासारखे चित्र जिल्ह्यात तयार झाले आहे. शासनाने ग्रामपंचायत पातळीवर विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असताना या निधीचा योग्य विनियोग करण्याऐवजी योजना स्वतःचे खिसे भरण्यासाठी राबवल्या जात असून पाचलकरसारख्या अपप्रवृत्तीला ठेचून काढण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली असून आता याप्रकरणी भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.