पालघर-योगेश चांदेकर
जमिनीची गुणवत्ता आणि भूजलाचेही नुकसान
पालघरः गेल्या काही दिवसांपासून बोईसर परिसरात मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी मोकळ्या नाल्याजवळील जागेत टाकले जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून भूजल व जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून आमदार विलास तरे यांनाही याबाबतचे पत्र देण्यात आले आहे.
बोईसर परिसरात काही रासायनिक माफिया मंडळी राजरोसपणे नदी नाल्यावरील झाडीत रसायने टाकत आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर आणि धोकादायक आहे. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. याबाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नीलम संखे, विभागप्रमुख अजय दिवे तसेच अतुल देसाई आदींनी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
तक्रारी करूनही कारवाईकडे दुर्लक्ष
शिवसेनेने या प्रकरणाचा निषेध केला असून स्थानिक पातळीवर याबाबत अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस व परिणामकारक कारवाई झालेली नाही, असे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात निदर्शनास आणण्यात आले आहे. एका ट्रकमधून रसायने टाकताना काही लोकांना पकडण्यात आले; परंतु तरीही त्यांच्या विरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. ही बाब निदर्शनास आणून पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आणि गंभीर बाबीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या मागण्या
संबंधित व्यक्तींवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अनधिकृत रासायनिक वाहतूक करणारे वाहन तात्काळ जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, संबंधित परिसराची तातडीने तपासणी करून प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी निगराणी यंत्रणा बसवावी अशा मागण्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. शिवसेनेने या प्रकरणी दिलेल्या निवेदनाची आता पोलिस अधीक्षक काय दखल घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.