CM Devendra Fadnavis | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज एका कार्यक्रमात जाहीर केले की, राज्य सरकारची ‘ नमो शेतकरी महासन्मान योजना ‘ अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम वाढवून १५ हजार रुपये करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये आणि राज्य सरकारच्या योजनेतून सहा हजार रुपये असे दरवर्षी बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत होते. मात्र, आता ही रक्कम वाढवून १५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘एक रुपयात पीक विमा योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपयांची विम्याची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्यासाठी कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे.’
त्यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांना शेतीत प्रयोगशील राहावे लागेल. शेतीचे क्षेत्र कमी झाल्याने उत्पादकता वाढवून शेती फायद्याची कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करावा लागेल. शेती क्षेत्रात शेतमजूर मिळण्याची संख्या कमी होत असल्यामुळे यांत्रिकीकरण महत्त्वाचे झाले आहे.
अल्प भू-धारक शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण परवडण्यासाठी गट शेती, सामुहिक औजारांची बँक सुरू केली आहे. ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना कृषी व्यवसाय संस्थांमध्ये रुपांतरीत करण्याचे काम सुरू केले आहे.
सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणनेनुसार यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दिला जात होता, त्यात त्रुटी होत्या. केंद्राने नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून आवास योजनेंतर्गत राज्यातील अतिरिक्त २६ लाख कुटुंबांना घरकुलांचा लाभ होणार आहे.