पालघर: पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दादर ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाडीला पालघर स्थानकांवर अतिरिक्त थांबा देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार, आता दादरहून सुटणारी भुसावळ गाडी पालघरला थांबेल.
०९०५१/०९०५२ दादर-भुसावळ या विशेष गाडीला पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा दिला आहे. मुंबई रेल प्रवासी संघाने ही मागणी केली होती.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च २०२५ पासून दादरहून सुटणारी दादर-भुसावळ विशेष गाडी क्रमांक ०९०५१ ला पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही ट्रेन पालघर स्टेशनवर ०१.२९ वाजता पोहोचेल आणि ०१.३१ वाजता निघेल. त्याचप्रमाणे, १५ मार्च २०२५ पासून भुसावळहून सुटणाऱ्या ०९०५२ भुसावळ-दादर विशेष गाडीला पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही ट्रेन पालघर स्टेशनवर ०३.१७ वाजता पोहोचेल आणि ०३.१९ वाजता निघेल.