पालघर-योगेश चांदेकर
पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने भरत राजपूत यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना उमेदवारी दिली आहे. राजपूत यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधक एकत्र आले असून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप तसेच विरोधकांच्या महाविकास आघाडीने शक्तीप्रदर्शन केले असले, तरी या निवडणुकीत राजपूत यांचे पारडे जड आहे. विरोधकांनी व्यक्तिगत टीकेवर भर दिला असला, तरी राजपूत यांनी मात्र आपण काय केले आणि भावी काळात काय करणार आहोत, अशा विकासात्मक मुद्द्यांचा आधार निवडणुकीत घेतला आहे.
डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी मंगळवारी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत डहाणू शहरातील ३८ हजार ६९३ नागरिक मतदानासाठी पात्र असून त्यापैकी सुमारे १२ ते १४ हजार मतदार पूर्वेकडील भागात राहतात. पूर्वेकडून सात नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. हा भाजपचा बालेकिल्ला असून विरोधकांना तो काबीज करणे अवघड दिसते. डहाणूमध्ये उच्चशिक्षित व मध्यमवर्ग यांचे प्रमाण वाढले आहे आणि मध्यमवर्ग हा सर्वसाधारणतः भाजपच्या पाठीशी उभा राहतो, असा इतिहास आहे. याशिवाय डहाणूच्या किनारपट्टी भागामध्ये मच्छीमार, धोडी भंडारी तसेच अल्पसंख्याक समाजाचे मतदान आहे; परंतु एकूण मतदानाचा विचार करता मध्यमवर्गीयांचे प्रमाण जास्त असून हा भाजपचा प्लस पाईंट आहे.

राजपूत आणि यश हे समीकरण
डहाणू नगरपालिकेत २०१७ मध्ये राजपूत हेच नगराध्यक्षपदी निवडून आले होते. भाजपने त्यांना दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी दिली. सर्वसाधारणतः भाजपमध्ये जिल्हाध्यक्षपदाची संधी पुन्हा दिली जात नाही; परंतु राजपूत यांचे नेतृत्व पाहून आणि त्यांच्या संघटन चातुर्याचा विचार करून भाजपने पुन्हा त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या डहाणू जनता बँकेमध्ये भारत राजपूत यांच्यात नेतृत्वाखाली पॅनेल सत्तेत आले. बाजार समितीचा सभापती त्यांनीच निवडला.
विरोधकांचे आरोप आणि राजपूत यांचे उत्तर
सध्या राजपूत यांच्यावर टीका करणारे काही संचालक आता महाविकास आघाडीकडून प्रचारक आहेत. विरोधकांनी डहाणूसाठी अन्य शहरांच्या तुलनेत मिळालेला कमी निधी हा प्रचाराचा मुद्दा बनवला असला, तरी राजपूत मात्र हा मुद्दा खोडून काढतात. गेली तीन वर्ष डहाणू नगरपालिकेत प्रशासक आहे. त्यापूर्वीच्या पाच वर्षात आम्ही पाणीपुरवठा, वीजपुरवठ्यासह अनेक कामे केली. डहाणू संवेदनशील क्षेत्रात येत आहे, तरीही येथे काही कामे करायची आहेत. भूमिगत गटारीसह अनेक योजना हाती घेतल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

टीका करणाऱ्यांनी माझ्या कामाविरोधात आंदोलन का केले नाही?
आम्ही जर कामे केली नव्हती, तर आता जे विरोधक ओरड करतात, त्यांनी त्या वेळी रस्त्यावर येऊन आमच्या विरोधात का आंदोलन केले नाही असा प्रश्न राजपूत विचारतात. डहाणू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही सध्या विरोधात असलेले काही लोक राजपूत यांच्या बरोबर होते. आता ते सभांमधून राजपूत यांच्यावर एकांगी, हुकूमशाही पद्धतीचे, जनतेत न मिसळणारे असे आरोप करतात. त्याला राजपूत यांनी सविस्तर उत्तर दिले आहे. मी अहंकारी आहे, मी शिवीगाळ करतो असा साक्षात्कार माझ्या विरोधात असलेल्यांना आत्ताच का झाला, डहाणू जनता बँकेच्या निवडणुकीच्या वेळी व डहाणू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीच्या वेळी त्यांना हे दिसले नव्हते का, असे प्रश्न ते उपस्थित करतात.
हप्ते घेणाऱ्यांचा जनतेशी तेवढाच संबंध
विरोधकांनी माझ्यावर कितीही व्यक्तिगत स्वरूपाचे टीका केली, तरी त्याला मी व्यक्तिगत टीकेतून उत्तर देणार नाही, असे सांगताना कोणाचेही नाव न घेता आपल्या विरोधातील उमेदवार पूर्वी कसे हप्ते घेत होते, रेल्वे स्टेशनमधून कसे पैसे जमा केले जात होते, गणेशोत्सवासाठी पैसे कसे जमा केले जात होते, त्यांचा व्यवसाय काय आणि समाजकार्यासाठी ते किती वेळ देतात असे अनेक सवाल राजपूत यांनी केले. आपण २४ तास जनतेबरोबर आहोत. जनता आपल्याबरोबर आहे. जनता आणि आमचे अतूट नाते आहे, ते कधीही तुटणार नाही. जनतेच्या प्रश्नासोबत आम्ही असल्यामुळे विरोधकांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनापेक्षा कितीतरी अधिक पटीने आमच्याबरोबर लोक आले, असा दावा राजपूत यांनी केला.

विरोधकांना त्यांचीच लायकी समजली!*
डहाणूच्या नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी राजपूत यांचा सामना थेट माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र माच्छी यांच्याशी आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असून त्यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट तसेच अन्य सर्वांची साथ आहे. भाजप आणि महायुतीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. असे असले तरी केवळ डहाणूच नाही, तर पालघर जिल्ह्यातील आता निवडणूक होणाऱ्या सर्व नगरपालिकांचे नगराध्यक्ष आणि सर्वाधिक नगरसेवक भाजपचे निवडून येतील, असा विश्वास राजपूत हे वारंवार व्यक्त करतात. पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी तसा दावा केला आहे. आम्ही स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे विरोधकांना जनतेत आपली लायकी काय आहे, हे समजले आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे ते माझ्यावर व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप करतात. माझे रक्षक, माझी गाडी याबाबत ते बोलतात; परंतु मी काय विकासकामे केली, ते स्वतः काय विकास कामे करणार याबाबत ते काहीच बोलत नाहीत असे निदर्शनास आणून राजपूत यांनी विरोधकांना शुभेच्छा दिल्या.
‘जनता आणि मी कधीही वेगळे झालेलो नाही. आमचे नाते अतूट आहे. त्यामुळे मी जसा २४ तास जनतेसाठी कार्यरत असतो, माझे कार्यालय त्यासाठी अहोरात्र झटत असते, तसे विरोधकांचे काहीही नाही. ते उठतात कथी, नागरिकांचे फोन उचलतात कधी, हा प्रश्न आहे. त्यामुळे माझी त्यांच्याशी स्पर्धा आहे, असे वाटतच नाही. मी सुरुवातीपासून जे सांगत आलो आहे, त्याप्रमाणे नगराध्यक्षपदासाठी जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन मी निवडून येईल, तर माझे २७ सहकारी निवडून येतील.
भरत राजपूत, जिल्हाध्यक्ष भाजप व डहाणू नगराध्यक्षपदाचे उमेदवार

















