पालघर-योगेश चांदेकर
पालघरः डहाणू रोड जनता को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मिहीर शाह यांची अध्यक्षपदी, तर भरत राजपूत यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या दोन्ही निवडी अपेक्षेप्रमाणे झाल्या असून शाह यांना अडीच वर्षे अध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. ते यापूर्वी सात वर्षे बँकेचे अध्यक्ष होते.
डहाणू जनता को-ऑपरेटिव्ह बँकेची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत पूर्वीचे आणि आत्ताचे सत्ताधारी एकत्र येऊन डहाणू विकास आघाडी पॅनलची स्थापना करण्यात आली होती. या पॅनेलच्या महिला राखीवमधील दोन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या, तर १३ जागांसाठी निवडणूक झाली. विरोधी प्रगती जनता पॅनलला एकही जागा मिळाली नाही. दुप्पट, तिपटीहून अधिक मते घेऊन डहाणू जनता आघाडीचे सर्व १३ सदस्य निवडून आले होते.
पदाधिकाऱ्यांबाबत एकमत
बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदी कोणाची निवड होणार याबाबत औत्सुक्य होते. सहाय्यक निबंधक अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी मिहीर शाह यांचा, तर उपाध्यक्षपदासाठी भरत राजपूत यांचा अर्ज दाखल झाला. अन्य कुणाचाही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने या दोघांचीही बिनविरोध निवड करण्यात आल्याचे पाटील यांनी जाहीर केले.
पुढचे अध्यक्षपद भरत राजपूत यांना
डहाणू जनता को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्षपद पहिले अडीच वर्षे मिहीर शाह यांना, तर पुढची अडीच वर्षे भरत राजपूत यांच्याकडे जाणार आहे. शाह यांची बँकिंग क्षेत्रातील जाणकार म्हणून ओळख आहे. बँकेला दिशा देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, तर भरत राजपूत यांचे पॅनल ही पूर्वी बँकेत सत्तेत होते. या दोघांनाही बँकेच्या कारभाराचा चांगला अनुभव असून डहाणू जनता कॉ-ऑपरेटिव्ह बँकेचा शाखा विस्तार करण्याबरोबर या बँकेचे डिजिटीलायझेशन करण्याचा नव्या संचालक मंडळाचा प्रयत्न आहे.
यांचे सहकार्य
या बँकेचे मार्गदर्शक, माजी आमदार आनंदभाई ठाकूर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हिेतेंद्र पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत बारी, सुनील चोपडे, शैलेश दोडे आदींचे या निवडणुकीत सहकार्य लाभले.
कोट
‘डहाणू जनता को-ऑपरेटिव्ह बँकेची सत्ता सभासदांनी मोठ्या अपेक्षेने आमच्या हाती दिली आहे. बँकेच्या ठेवी पाचशे कोटी रुपयांवर देण्याचा तसेच बँकेच्या शाखा वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर कोअर बँकिंग, नेट बँकिंग, एटीएम, क्रेडिट कार्ड अशा सुविधा देण्यावर ही आम्ही भर देणार आहोत.
भरत राजपूत, नवनिर्वाचित उपाध्यक्ष, डहाणू जनता को-ऑपरेटिव्ह बँक, डहाणू