पालघर-योगेश चांदेकर
पुरवठा विभागाकडून तिघांची चौकशीसाठी नियुक्ती
पालघरः केंद्र सरकारच्या अंत्योदय आणि प्राधान्यक्रम योजनेतील धान्य वितरणात मोठे घोटाळे होत असल्याचे वृत्त ‘लक्षवेधी’ने प्रकाशित केल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणी तिघांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, गेल्या सहा महिन्यांतील शासकीय धान्य दुकानातील गोदामांची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा पुरवठा कार्यालयाला सादर करण्याचे आदेश प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा महल्ले यांनी दिले आहेत.
‘लक्षवेधी’ने पुराव्याच्या आधारे डहाणू तालुक्यातील रास्त भाव दुकानांमार्फत केल्या जात असलेल्या धान्य वितरणात कसा घोटाळा होतो, याचा पर्दाफाश केला होता. भिवंडी आणि बोरिवली इथून डहाणू तालुक्यात धान्य पाठवल्यानंतर मध्येच धान्याला कसे पाय फुटतात आणि ट्रकचालक आणि गोदामपाल यांचे कसे साटेलोटे आहे याचे पुरावे ‘लक्षवेधी’ने दिले होते.
मध्येच धान्याच्या वजनात अफरा तफर
भिवंडी आणि बोरिवलीच्या गोदामातून धान्य निघाल्यानंतर त्यातील काही गोणी परस्पर विकल्या जात आहेत. ट्रकचालक काही होण्याचे पैसे स्वतःकडे ठेवून काही होण्याचे पैसे मात्र गोदामपालाकडे देत होता. गोदामात मात्र भिवंडी आणि बोरिवली इथून पाठवलेल्या धान्य इतकीच नोंद होत होती. ट्रकचालक गोदामपालांना पैसे देत असल्याचे पुरावे ‘लक्षवेधी’च्या हाती आले होते. भिवंडी आणि बोरिवली येथून धान्याच्या गोणी जेव्हा पाठवल्या जातात, तेव्हा त्यातील प्रत्येक गोणीत ५० किलो ५०० ग्रॅम धान्य असणे आवश्यक आहे; परंतु प्रत्यक्षात चार ते पाच किलो धान्य कमी झालेले असते?.
धान्यात घोळ होतो कसा?
डहाणू तालुक्यातील येणाऱ्या सरासरी १५ हजार क्विंटल धान्याचा विचार करता सुमारे बाराशे क्विंटल धान्य मध्येच गायब होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे? रास्त भाव दुकानदारांना धान्य कमी मिळते. याबाबत रास्त भाव दुकानदारांच्या संघटनेने तक्रारी केल्या होत्या; परंतु पुरवठा विभागाने रास्त भाव दुकानदारांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली. केंद्र व राज्य सरकारच्या अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत डहाणू तालुक्यात सुमारे सुमारे दोन लाख ३५ हजार लोकांना धान्य पुरवले जाते. गहू आणि तांदूळ नागरिकांना मोफत दिला जातो; परंतु रास्त भाव दुकानदारांना पुरेसा पुरवठा होत नसल्याने तेही शिधापत्रिकाधारकांना कमी धान्य देतात; परंतु हे धान्य निशुल्क असल्याने त्याबाबत तक्रार करण्याची तसदी शिधापत्रिकाधारक घेत नाहीत.
‘लक्षवेधी’चा आदेशात उल्लेख
या बाबत ‘लक्षवेधी’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा महल्ले यांनी एक आदेश काढला आहे. सोमवारी काढलेल्या या आदेशात ‘लक्षवेधी’चा उल्लेख आहे. गेल्या सहा महिन्यातील डहाणू शासकीय धान्य गोदामाची पडताळणी करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला देण्यास बजावले आहे. या करिता तीन जणांची तपासणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आवक-जावक नोंद तपासणार
गेल्या सहा महिन्यांत डहाणू तालुक्यातील गोदामांना भिवंडी आणि बोरिवली इथून किती धान्य पुरवठा झाला, गोदामात किती धान्य आले आणि डहाणू तालुक्यातील २०७ रास्त भाव दुकानदारांना प्रत्यक्षात किती धान्याचा पुरवठा झाला याची पडताळणी आता हे पथक करणार आहे.

















