पालघर-योगेश चांदेकर
सदानंद येगारे या शिक्षकावर शिक्षण विभाग मेहेरबान
लाखो रुपयांच्या बूट खरेदीत अनियमितता
पालघरः शिक्षकाने शिकवण्याचे काम करायचे असते. विद्यार्थी घडवायचे काम करायचे असते; परंतु त्याचा विसर शिक्षकाला पडला असून, डहाणू तालुक्यातील सदानंद येगारे या जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शिक्षकाने दुकानदारी सुरू केली आहे. डहाणू तालुक्यातील शाळांना बूट व अन्य साहित्य पुरवण्याचे ठेके हा ठेकेदार घेत असून त्यात अनेक त्रुटी आढळल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले असता त्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
पालघर जिल्ह्यात अगोदरच शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे, असे ‘असर’ या संस्थेच्या पाहणीत आढळले आहे. पालघर जिल्ह्यात शिक्षणाची गुणवत्ता अतिशय कमी असून, त्यात शाळाबाह्य मुलांचे तसेच शाळा सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात शिक्षकांचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे अगोदरच शैक्षणिक दर्जाची बोंबाबोब असताना दुसरीकडे शिक्षक शिकवण्याऐवजी ठेकेदारी करत असून. शाळांना साहित्य पुरवण्याचे काम करत असून, त्यातून लाखो रुपयांची कमाई करत आहेत.
शाळांकडून परस्पर खरेदीचा निर्णय
डहाणू तालुक्यातील वेगवेगळ्या शाळांना बूट पुरवण्याचे काम एका शिक्षकाने घेतले असून सुमारे ४५६ ठिकाणी बूट पुरवण्यात आले आहेत. त्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या एजन्सी काम करत असून त्यांची बिलेही बोगस, संशयास्पद आढळली आहेत. वास्तविक पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने समग्र शिक्षा अंतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन मोजे घेण्याचा आदेश काढला. पंचायत समितीचा हा आदेश आल्यानंतर बूट व मोजे खरेदी करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने घ्यायला हवा होता. किमान त्यांचे तसे ठराव असायला हवे होते; परंतु शाळांनी शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेतात परस्पर बूट व मोजे खरेदीचा निर्णय घेतला.
पाहणीत अनेक त्रुटी
गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या बिलांच्या तपासणीत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. अनेक बिलांवर तारखा नाहीत. बहुतांश बिले जीएसटी नंबर नसलेली आहेत. कोटेशन मंजूर झाले किंवा नाही, याचा बिलांवर उल्लेख नाही. अनेक ठिकाणी तर कोटेशन न घेताच बिले दिल्याचे दिसते. पंचायत समितीच्या पत्रानुसार, शाळांनी जीएसटी नंबर असलेल्या दुकानातून वस्तू खरेदी करणे अनिवार्य असताना आणि शाळांना याची माहिती असतानाही बहुतांश शाळांनी जीएसटी नंबर नसलेल्या वेंडरकडून कोटेशन मागून बूट व मोजांची खरेदी केली आहे. बहुतांश शाळांनी ज्या वेंडरकडून खरेदी केली आहे, त्याच वेंडरने कोटेशन दिले असल्याचे दिसते. एकाच वेंडरने वेगवेगळ्या प्रकारची बिले दिल्याचे या तपासणीत आढळून आले आहे. कोटेशनवर अनेक शाळांची नावे नाहीत, असे प्रकार गटविकास अधिकाऱ्यांच्या तपासणीत आढळून आले आहेत.
ठराव न घेताच खरेदी
अनेक शाळांनी कुणाकडून बूट व मोजे खरेदी करायचे याबाबतचे ठरावच घेतलेले नाहीत. ठराव घेतला असेल, तर त्यावर कोटेशन नंबर व दिनांक लिहिलेले नाहीत. असे अनेक प्रकार यात दिसून आले आहेत. बऱ्याच ठिकाणी हमीपत्र व उपयोगिता प्रमाणपत्र जोडलेले नाही, तरीही त्यांना पैसे देण्यात आल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत निदर्शनास आले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे अनेक बिले चुकीची असून, तरीही ती देण्यात आली आहेत.
शिक्षकाचे एवढे धाडस कसे?
सदानंद येगारे हा शिक्षक गेल्या अनेक वर्षापासून शिकवण्या-व्यतिरिक्त अन्य व्यवसाय करीत असून त्याच्यावर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची कृपा असल्याचे त्याच्या एकूण व्यवहारावरून दिसते. डहाणू तालुक्यात बूट खरेदीत लाखो रुपयांचा ठेका घेण्याचे धाडस हा शिक्षक कसा करू शकतो, हा एक गंभीर प्रश्न आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील हा शिक्षक वेगवेगळ्या नावांनी, नातेवाइकांच्या नावाने दुकाने टाकत असून प्रत्यक्षात मात्र स्वतःच हे व्यवहार करत असल्याचे स्पष्ट होत असून आता या प्रकरणात संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अभय असल्याने मोकाट
दरम्यान, या शिक्षकाने व्हॉटस्ॲप स्टेटस्वर त्याच्या शिकवण्यातिरिक्तच्या ‘उद्योगा’चा उल्लेख केला आहे. असे असताना पंचायत समिती त्याच्यावर कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा शिक्षक अन्य शिक्षकांना पाच टक्के व्याजाने कर्जाऊ रक्कम देत असल्याचा आरोप आहे. ही गंभीर बाब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या निदर्शनास आणताच त्यांनी याप्रकरणी आपण लक्ष घालू असे सांगितले आहे.
‘सीईओं’च्या कारवाईकडे लक्ष
पूर्वी एका प्रकरणात शिक्षकाने असेच शिकवण्याचे सोडून अन्य व्यवसाय सुरू केला, तर त्याच्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली होती. आता येगारे या शिक्षकानेच तर पुरावे मागे सोडूनच ठेकेदारी सुरू केली असून, त्याच्यावर निलंबानची कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘डहाणू तालुक्यातील शाळांमधील बूट व मोजे खरेदी प्रकरणातील गैरप्रकार माझ्या कानावर घातला हे बरे झाले. शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवण्या व्यतिरिक्त खाजगी अशी अन्य कामे कुणी करीत असेल, तर त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल.
–प्रकाश निकम, अध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर